मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. अमृता खानविलकर ही कायमच तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. मात्र अनेकदा कलाकरांना सोशल मीडियावर असभ्य कमेंट्सचा सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री अमृताबरोबरही घडला आहे. अमृताने शेअर केलेल्या एका पोस्टवर एका व्यक्तीने अश्लील कमेंट केल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अमृता खानविलकरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने गुरुचरित्रातील काही ओळी शेअर केल्या आहेत.
“दोन वर्णाचा ‘गुरु’ हा शब्द चारी पुरुषार्थाची प्राप्ती करुन देणारा आहे. गुरु हाच माता व पिता आहे. तसाच परम शिव आहे. शिव कोपला तर त्याचे रक्षण करु शकणार नाही. ईश्वर प्रसन्न झाला तर त्याची ओळख पटविणेसाठी गुरु पाहिजे पण गुरु प्रसन्न असलेस ईश्वर त्याचे अधीन असतो. गुरु कुठेही शास्त्राचा अर्थ, तीर्थे, व्रते, योग, तप आदिचे ज्ञान प्राप्त होते”, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “आपल्याला हवं ते नेहमी मिळत नाही पण…” ‘झलक दिखला जा’ मधून बाहेर पडलेल्या अमृता खानविलकरच्या पोस्टने वेधलं लक्ष
अमृताच्या या पोस्टवर अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तसेच अनेक ती गुरुचरित्र वाचत असल्याने तिचं कौतुकही करताना दिसत आहेत. पण असे असतानाही एका नेटकऱ्याने अमृताच्या पोस्टवरवर अश्लील कमेंट केली आहे. “गुरुचरित्राबद्दल बोलायची लायकी नाही तुमची. शरीर दाखवणाऱ्यांनी याबाबत बोलू नये.” अशी कमेंट त्या व्यक्तीने केली आहे. त्यावर अमृतानेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
“कोण तुम्ही? अशा भाषेत परत बोललात तर पोलिसात तक्रार करेन कळलं? याबाबतीत कोणाचं उगाचच ऐकून घेणार नाही”, असे तिने त्या व्यक्तीच्या कमेंटला उत्तर देताना म्हटले आहे.
अमृताच्या या उत्तरानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. तिचे अनेक चाहते यावर कमेंट करत पाठिंबा देताना दिसत आहेत. “अमृता तुझे प्रोफेशन आहे ते त्यात तू काही चूक करते असे मला जाणवत नाही. तू जी पोस्ट केली आहेस, तू उत्तम आहे फक्त एक लक्षात ठेव कायम महाराष्ट्र घडला हा आंबेडकर,फुले आणि साठे मुळे हेच मानतात लोक बाकी टिळक,सावरकर,गोखले,गोडसे गोटया खेळत होते असे समजतात. असो सोडून देत जा”, अशी कमेंट तिच्या एका चाहत्याने केली आहे.
“ताई त्याला कलाकार काय असतो हेच कळाल नाय खर तर यालाच कावीळ झाली आहे आणि त्याला आत्म परिक्षनाची गरज आहे फक्त देव करो याच्या घरात कलाकार जन्माला येवो”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
आणखी वाचा : आधी ‘हास्यजत्रा’ सोडलं, आता ‘फू बाई फू’लाही पॅडी कांबळेचा रामराम, कारण आले समोर
दरम्यान या व्यक्तीने फेसबुकवर केलेली ही कमेंट डिलीट केली आहे. तरीही कमेंट सेक्शनमध्ये अमृताचे चाहते या व्यक्तीच्या असभ्य वर्तनाबाबत टीका करत आहेत. याशिवाय अमृताच्या उत्तराचं कौतुकही करताना दिसत आहेत.