मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं सिनेविश्वात मोठं नाव कमावलं आहे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील तिच्या ‘चंद्रा’ या गाण्यामुळे आजही तिला चंद्रा या नावानं ओळखतात. अमृतानं तिच्या अभिनय व नृत्यकौशल्याच्या जोरावर लाखोंचा चाहता वर्ग कमावला आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच अमृतानं तिच्या आरोग्याबाबतची माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता खानविलकरच्या हाताला दोन महिन्यांपूर्वी दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिच्या हाताला फार जास्त सूज आली होती. त्यामुळे कोणतंही काम करणं तिला कठीण जात होतं. अशात आता ती यातून बरी होत आहे. त्याची माहिती देणारा एक व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता लिफ्ट पुश करताना दिसत आहे.

व्हिडीओ पोस्ट करीत तिनं त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. “माझ्या हाताला झालेल्या दुखापतीनंतर जवळजवळ दोन महिन्यांनंतर मी माझ्या सर्वांत शांत ठिकाणी लिफ्ट पुश करू शकले. तसेच माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार मी हे जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकले.”

अमृताला झालेल्या दुखापतीनंतर तिचे चाहते चिंतेत होते. मात्र, आता ती यातून सावरत असल्यानं या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे. “म्हणजे गेल्या दोन महिन्यांत तू अजिबात व्यायाम केला नाहीस का?”, असं तिला कमेंटमध्ये विचारण्यात आलं आहे. आणखी एकानं कमेंटमध्ये, “तू नेहमीच एक फायटर म्हणून काम करतेस. तुला परत पाहून आनंद झाला. तुला आणखी ताकद मिळो”, असंही म्हटलं आहे.

अमृताच्या हाताला नेमकं काय झालं होतं?

अमृतानं दोन महिन्यांपूर्वी १ डिसेंबरला एक पोस्ट शेअर केली होती. तिनं हाताचे दोन फोटो पोस्ट केले होते. त्यात एका फोटोत तिचा हात सुजलेला दिसत होता आणि दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हाताला पट्टी बांधलेली होती. फोटो पाहून अमृताच्या हाताचं हाड मोडलं असावं, असं काहींना वाटलं. मात्र, हातातील सॉफ्ट टिश्यू डॅमेज झाल्याचं तिनं सांगितलं होतं.

अमृता खानविलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांना तिचं काम आणि खासगी आयुष्य याबद्दल अपडेट देत असते. तिनं मराठी चित्रपटांसह बॉलीवूडमध्येही तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवलं आहे. नुकतीच ती ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातील ‘वंदन हो’ या गाण्यात दिसली. अमृता सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे.