मराठीमध्ये आता दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’. या चित्रपटाने हिंदी चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर मागे टाकलं. अजूनही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. कलाकार मंडळींनीही हा चित्रपट पाहिला. अभिनेत्री अमृता खानविलकरला देखील हा चित्रपट पाहिल्यानंतर राहावलं नाही आणि तिने एक पोस्ट शेअर करत प्रसादचं तोंडभरुन कौतुक केलं.
आणखी वाचा – Photos : सिद्धार्थ जाधवची कुटुंबाबरोबर दुबई ट्रिप, महागड्या गाडीची सफर अन् बरंच काही
‘धर्मवीर’मध्ये प्रसादने केलेल्या कामाला सगळ्यांनीच उत्तम दाद दिली. हुबेहुब धर्मवीर आनंद दिघे रुपेरी पडद्यावर साकारण्यात तो यशस्वी ठरला. अमृताने देखील तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत ‘धर्मवीर’ पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर तिने प्रसादसाठी खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये प्रसाद नट म्हणून किती उत्तम आहे?, त्याचं काम याबद्दल ती बोलली. तसेच दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे देखील तिने आभार मानले.
अमृता म्हणाली, “भेटला विठ्ठल…प्रिय प्रसाद गेल्या काही महिन्यांची गडबड धावपळ तुला माहितीच आहे. तेव्हा ‘धर्मवीर’ बघायला उशीर झाला त्यासाठी माफी मागते. पण कलाकृती अजरामर असेल तर ती कधीही पाहिली तरी ती तितकीच प्रभावी असते. काल ‘धर्मवीर’ पाहिला. प्रसाद ओक शोधत होते पण तो कुठेच सापडला नाही. सापडले ते दिघे साहेब. मी त्यांना कधी पाहिलं नाही भेटले नाही. पण काल ते ही घडलं असं वाटलं. ते डोळे, हावभाव, बोलणं, ते समर्पण तुझ्यासारख्या नटालाच हे जमू शकलं असतं आणि तू त्याचं सोनं केलंस.”
आणखी वाचा – VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता अजूनही राहतो चाळीत, शेअर केला घराचा व्हिडीओ
अमृताने ‘धर्मवीर’ पाहिला आणि ती अगदी भारावून गेली. ‘चंद्रमुखी’ चित्रपट आणि त्याच्या प्रमोशनमध्ये अमृता गेले काही दिवस व्यग्र होती. त्यामुळेच हा चित्रपट पाहण्यास तिला उशीर झाला. पण काल तिने हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रसादच्या कामाला दाद द्यायला ती विसरली नाही. फक्त अमृताच नव्हे तर अनेक कलाकारांनी प्रसादच्या ‘धर्मवीर’ चित्रपटाचं आणि त्याच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.