विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकणार आहे. अमृता खानविलकरचे या चित्रपटासाठी विशेष कौतुक केले जात आहे. नुकतंच अमृता खानविलकरची खास मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडने तिचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर अमृता खानविलकरच्या आगामी चंद्रमुखी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या फोटोसोबत अंकिताने अमृताचे नृत्य, तिची भूमिका, त्यांची मैत्री याबाबत भाष्य केले आहे. अंकिताने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावर विविध कलाकारांसह अमृतानेही कमेंट केली आहे.

अंकिता लोखंडेची पोस्ट

“अम्मू…, मला लोकांना आपल्याबद्दल सांगण्यासारखे आणि बोलण्यासारखे खूप काही आहे. पण आज तुझा दिवस आहे आणि मी ही पोस्ट वाचणाऱ्या सर्वांना सांगू इच्छिते की, तू माझ्यासाठी एखादी स्टार नाहीस तर सेलिब्रिटी आहे. तू खरी कलाकार आहेस.

तू माझ्यासाठी एक अशी कलाकार आहेस जी आपल्या अभिनयाच्या जोरावर आम्हाला हसवू किंवा रडवूही शकते. मला अजूनही चांगलं आठवतंय की जेव्हा आपण झी सिने स्टार की खोज या कार्यक्रमात एकत्र होतो, तेव्हा तुझ्या आणि माझ्यामध्ये नेहमीच कोण चांगला नाचतो याची एक स्पर्धा असायची. पण तुलाही माहिती आहे की मी नेहमीच एक सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. बरोबर ना अम्मू? हा झाला विनोदाचा भाग. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा मी तुझे भलेमोठे पोस्टर लाँच झालेले पाहिले त्यावेळी माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले होते. तुला तिथे पाहणे हे एखाद्या स्वप्नासारखे होते आणि त्यांनी ज्या प्रकारे ते लाँच केले ते पाहून फक्त wooowwwwwwwww इतकं वाटलं.

त्या पोस्टरवर झळकणारी व्यक्ती माझ्यासाठी अमृता नव्हती…तर माझ्यासाठी ती चंद्रमुखी होती. ती कौतुकाची पोचपावती अम्मूला इतक्या वर्षांनंतर मिळाली होती. तुला त्या ठिकाणी पाहून मला खरोखर खूप अभिमान वाटला. अम्मूचा प्रवास फारच अद्भूत आहे. मी खरोखर आता एका अशा मुलीकडे पाहत आहे जी एक चांगली मुलगी आहे, चांगली बहीण आहे, चांगली पत्नी आहे, एक चांगली मैत्रिण आहे आणि एक उत्तम अभिनेत्री देखील आहे.

तू यासाठी खरोखरंच पात्र आहेस. मला खात्री आहे की तुझ्यापेक्षा काकूंनाच तुला तिथे पाहून फार आनंद झाला असले. सिनेसृष्टीत स्वत:चे नाव कमावण्यासाठी तू खरच खूप मेहनत घेतली आहेस आणि आता तुला टॅलेंटवर विश्वास ठेवणाऱ्या अशा प्रतिभावान लोकांसोबत काम करताना पाहून फारच आनंद होत आहे. तू या प्रत्येक यशासाठी पात्र आहेस. अम्मू तुला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आज तुझ्या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आणि मी नक्कीच एकदा तरी तुझ्यासोबत या गाण्यावर नृत्य करणार आहे.

तुला आणि चंद्रमुखीच्या निर्मात्यांना खूप खूप शुभेच्छा. तुला मोठ्या पडद्यावर पाहण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. देव सदैव तुझ्या पाठिशी राहू दे. तू जशी आहेस तशीच राहा. खूप खूप प्रेम. २००४ पासूनची मैत्री मरेपर्यंत कायम राहिलं”, अशी पोस्ट अंकिता लोखंडेने लिहिली आहे.

अंकिताच्या पोस्टवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे. “तू माझ्या बहिणीप्रमाणेच आहेस. या सुंदर पोस्टसाठी खूप खूप धन्यवाद”, असे अंकिताने म्हटले. दरम्यान अंकिताची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ankita lokhande share instagram post about amruta khanvilkar nrp