समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी आणि त्यांची पत्नी अभिनेत्री आएशा टाकिया यांच्यासोबत गोवा विमानतळावर गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. गोवा विमानतळावरील काही अधिकाऱ्यांनी माझ्यासह पत्नी आएशा टाकियासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर गोवा विमानतळातील अधिकाऱ्यांनी फरहान आझमींची माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फरहान आझमी, पत्नी आएशा टाकिया आणि त्यांचा मुलगा हे तिघेही गोव्याला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. मात्र काही दिवसांपूर्वी गोव्याहून मुंबईला परतत असताना अचानक त्यांना गोवा विमानतळावर थांबवण्यात आले. त्यावेळी फरहान यांचे नाव वाचून काही अधिकाऱ्यांनी त्यांना त्याच्या कुटुंबापासून वेगळे केले. तसेच त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

फरहान आझमी यांनी त्यांच्या ट्विटरवर या घटनेचे काही फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी त्या अधिकाऱ्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत ते म्हणाले, “मी ४ एप्रिल रोजी ६.४० वाजता गोव्याहून मुंबईला जाणार्‍या फ्लाइटमधून येत होतो. त्यावेळी काही वर्णद्वेषी अधिकारी आरपी सिंग, ए. के. यादव, कमांडर राऊत आणि वरिष्ठ अधिकारी बहादूर यांनी माझे नाव वाचताच मला माझ्या कुटुंबापासून वेगळे केले.

यावेळी त्या अधिकाऱ्यांनी लैंगिक आणि वर्णद्वेषी टिप्पणी केली. मला एका अधिकाऱ्याने स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. त्यासोबत माझी पत्नी आणि मुलाला माझ्यापासून वेगळ्या रांगेत उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर मात्र हे प्रकरण वाढत गेले. विमानतळावरील कौटुंबिक सुरक्षा तपासणीदरम्यान इतर सर्व कुटुंबांची एकत्रित तपासणी सुरु होती. पण आमच्या कुटुंबाची वेगवेगळी तपासणी केली. यानंतर एका वरिष्ठ अधिकारी बहादूर यांनी CISFHQrs च्या एका अधिकाऱ्याला इशारा केला. त्यावेळी त्याने मला धमकावले. या वर्णद्वेषी अधिकाऱ्याने माझा खिसा तपासत असताना माझ्यावर अत्यंत वाईट लैंगिक टिप्पणी केली. त्यावेळी माझ्या खिशात फक्त ५०० रुपये होते, असेही फरहान आझमींनी म्हटले.

या संपूर्ण प्रकरणानंतर गोवा विमातळावरील अधिकाऱ्यांनी फरहान आझमी यांची माफी मागितली. त्यावेळी ट्वीट करत म्हटले की, “या प्रवासादरम्यान तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल”, असे त्यांनी सांगितले आहे.

फरहान आझमी आणि अभिनेत्री आएशा टाकिया यांचा विवाह १ मार्च २००९ रोजी झाला होता. त्यानंतर २ वर्षांनी म्हणजे २०११ पासून आएशाने बॉलिवूडकडे पाठ फिरवली. आयशाला मिकेल नावाचा मुलगा आहे. ती बॉलिवूडपासून दूर झाली असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती अनेकदा त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.