डिसेंबर महिन्याची पहिली तारीख येईपर्यंत सर्वत्र एकाच चित्रपटाच्या चर्चा पाहायला मिळणार यात शंका नाही. तो चित्रपट म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’. एका ऐतिहासिक कथानकावर या चित्रपटातून भाष्य करण्यात येणार असून, या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पद्मावतीचा ट्रेलर आणि त्यातील ‘घुमर’ हे गाणे सध्या सर्वत्र चर्चेत असतानाच आता त्यातील आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘भन्साळी प्रॉडक्शन एफसी’ या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या पोस्टरवर चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख ३० नोव्हेंबर देण्यात आल्यामुळे नेमका हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, असे प्रश्नही सुरुवातीला उपस्थित करण्यात आले. पण, त्यानंतर या प्रश्नाचे उत्तर सर्वांसमोर आले. ३० नोव्हेंबरला हा चित्रपट युएईमध्ये प्रदर्शित होणार असून, भारतात तो ठरलेल्या तारखेला म्हणजेच १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Presenting the Spectacular International Poster of Rani #Padmavati @deepikapadukone @shahidkapoor @RanveerOfficial @ShobhaIyerSant #SLB pic.twitter.com/l3rMiabk4d
— BhansaliProductionFC (@bhansaliprod_fc) November 8, 2017
पाहा : VIDEO : ‘घुमर’ करत दीपिका म्हणतेय ‘दिसला गं बाई दिसला’
‘पद्मावती’च्या या नव्या पोस्टरमधील दीपिकाचा लूक फार काही सांगून जात आहे. राणी पद्मावतीचा रुबाब आणि तिने केलेला जौहर या साऱ्याची पार्श्वभूमी पाहता हा फोटो चित्रपटाच्या ‘क्लायमॅक्स’ दृश्यातील असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये राणी पद्मावतीच्या रुपात दिसणाऱ्या दीपिकाने विविध प्रकारचे दागिने घातले असून, त्यात पारंपरिक माथापट्टी, माँगटिका, नथनी, रत्नजडीत हार या दागिन्यांचा समावेश आहे. या फोटोमध्ये दीपिकाच्या डोळ्यात ओसंडून वाहणारा आत्मविश्वास आणि एकनिष्ठता दिसते आहे. तिच्या आजूबाजूला बऱ्याच राजपूत महिलांची गर्दीही दिसते आहे. त्यामुळे हे राणी पद्मावतीच्या जौहरच्या वेळचे दृश्य असल्याचे म्हटले जात आहे. त्यामळे दीपिकाच्या या लक्षवेधी आणि तेजस्वी रुपामुळे चित्रपटाच्या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे, असे म्हणायला हरकत नाही.