‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जातं. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. गेल्या वर्षभरात ऋता ही ‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ यांसारख्या अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. ऋताने लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. ऋताने १८ मे २०२२ रोजी प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. यानंतर तिने अमराठी मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. आता यावर तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा विवाह १८ मे २०२२ रोजी झाला होता. त्या दोघांनी अत्यंत थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नाला अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांनी हजेरी लावली. प्रतीकबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अमराठी मुलासोबत लग्न करतात आणि नंतर घटस्फोट घेतात, असही तिला सुनावलं गेलं. त्यावेळी ऋताने शांत राहत यावर कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. पण आता तिने या ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा : “निर्मात्यांशी माझे नेहमीच…”, ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडण्याच्या चर्चांवर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण
नुकतंच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ऋताने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले. यावेळी तिने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगलाही सडेतोड उत्तर दिली. “आपल्याला सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची फार गरज नसते. माझं आणि प्रतीकचं लग्न ठरल्यावर अनेकांनी मला त्याच्या अमराठी असण्यावरून प्रश्न विचारले. यावरुनल मला सोशल मीडियावर ट्रोलही केलं.
पण त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन उगीच वाद वाढवण्यापेक्षा अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणं मला जास्त योग्य वाटलं. आपल्या निर्णयामुळे समोरच्याला काय वाटेल याचा विचार करत बसलो तर आयुष्यात आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे याकडे मी दुर्लक्ष केलं”, असे ऋताने यावेळी म्हटले.
आणखी वाचा- “चित्रपटातील कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात” हृता दुर्गुळेने व्यक्त केली खंत
दरम्यान ऋता दुर्गुळेने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ऋताने दुर्वा या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती फुलपाखरु या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत दिपूची भूमिका साकारली होती. यानंतर मात्र तिने छोट्या पडद्याला ब्रेक देत मोठ्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. ऋताने अनन्या आणि टाइमपास ३ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.