जुई गडकरी
महाविद्यालयात अभिनयाकडे अजिबात वळले नाही. तिथं पूर्ण लक्ष अॅडव्हर्टायझिंगकडे होतं. त्यामुळे नाटय़ शिबिरं, एकांकिका याकडे ओढले गेले नाही. पण मला गाण्याची खूप आवड होती. मी महाविद्यालयात असताना गाण्याच्या स्पर्धामध्ये भाग घ्यायचे. ‘बीएमएम’चे प्रकल्प आणि गाणं या दोन गोष्टींत मी रमून गेले होते. महाविद्यालयात माझं खूप मोठं मित्रांचं वर्तुळ होतं. आम्ही सगळे खूप फिरायला जायचो, खाणं-पिणं अगदी धमाल करायचो. कट्टा तर आहेच, त्यातही खासकरून कॅन्टीनमधील खवय्येगिरी आजही आठवते. शिकत असताना त्या वेळी गाणं आणि खेळ यांच्यात मी जास्त वेळ घालवायचे.
करिअरच्या सुरुवातीला मी झी मराठी वाहिनीच्या प्रोग्रामिंग डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून नोकरी केली. त्यानंतर मी एका ठिकाणी कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्या वेळी मी माझाही पोर्टफोलियो तयार केला होता. आई तेव्हा पोर्टफोलियो बघून म्हणाली होती की, तू अभिनय क्षेत्रात जायला हवंस. मग त्यानंतर मीही तसा विचार करू लागले होते. त्याच दरम्यान ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकेत मला भूमिका मिळाली. तिथून माझी अभिनयातली वाटचाल सुरू झाली. मीडियाची विद्यार्थिनी असल्यामुळे माझं कॅमेऱ्यामागचं शिक्षण झालेलंच होतं. त्यामुळे कॅमेऱ्यांपुढे काम करताना त्या त्या मालिकेच्या दिग्दर्शक आणि सहकलाकारांबरोबर काम करता करता शिकत गेले.
माझ्या घरी माझे वडील राज्यस्तरीय स्पर्धासाठी नाटकं लिहायचे. त्यांचं दिग्दर्शन करायचे. घरी नाटकाच्या तालमीही व्हायच्या; परंतु माझा मीडियातील अभ्यासावर जास्त भर होता. पण एक वेळ अशी आली की, महाविद्यालयात गाण्यांची आवडत जोपासत मी शास्त्रीय गाणं शिकले. त्यामुळे एका क्षणी गाण्यातच करिअर करायचा विचार मी केला होता.
परंतु बाजीराव मस्तानी मालिकेनंतर तुजविण सख्या रे, पुढचं पाऊल, सरस्वती, बिग बॉस आणि वर्तुळ अशा मालिकांमध्ये एकापाठोपाठ एक काम करत राहिल्यामुळे मी अभिनय क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरू लागले. पण या क्षेत्रात कुणीही माझं ओळखीचं नव्हतं. प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष आणि जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध नाव भरत दाभोळकर यांनी मला कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या टाळायच्या हे सांगितलं होतं. हे दोघेही मी कॉलेजला असल्यापासून माझ्या ओळखीचे होते. मी ठरवलं होतं काही वेगळंच आणि अभिनयात आल्यामुळे माझ्याकडून एकेक भूमिका साकारल्या गेल्या. मला जाहिरात कंपनीत नोकरी करायची होती; परंतु आता असं वाटतं की, अभिनयात आले हे खूप छान झालं. प्रेक्षकांचं मला खूप प्रेम मिळालं. माझ्या घरच्यांना आनंद वाटतो की मी अभिनय क्षेत्रात आहे.
अभिनय क्षेत्रातच सक्रिय असताना मला स्वत:ची निर्मिती संस्था काढायची आहे. मला आताही वाटतं की, एखाद्या जाहिरातीसाठी मी उत्तम लेखन (कॉपी रायटिंग) करू शकते. त्यातच तर मी शिक्षण घेतलं आहे. जाहिरात लेखनाबरोबरच चित्रपट लेखनही करायची इच्छा आहे. पण सध्या वर्तुळ मालिकेवर मी लक्ष केंद्रित केलं आहे.
चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरिज ही अभिनयाच्या दृष्टीने सगळी माध्यमं चांगली आहेत; परंतु सध्या वेबसीरिजच्या नावाखाली गलिच्छ कारभार चाललाय. त्यामुळे हे माध्यम निवडताना भीती वाटू लागलीय. कारण प्रेक्षकांना चुकीच्या गोष्टी बरोबर म्हणून दाखवल्या जातात. वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये काहीच धरबंध उरलेला नाही. ज्या गोष्टी दाखवण्याची काहीच गरज नाही, अशा गोष्टी वेबसीरिजमध्ये केल्या जातात, त्याची खरंच गरज नाहीय. त्यामुळे वेबसीरिज म्हटलं की अश्लीलता हे समीकरण होऊ लागलंय. या माध्यमावर सेन्सॉरशिप नाहीय, म्हणून काही वाट्टेल ते केले जात आहे.
म्हणूनच माध्यम निवडताना भीती वाटू लागलीय. आता तर मराठी माध्यमंही त्याच मार्गावर जात आहेत. त्याचीही भीती वाटते. आपल्या मराठी मनोरंजनात आशयामध्ये एक अभिजातता होती. ते आपण विसरत चाललो आहोत. मी लहानपणापासून ज्या आदराने या मनोरंजन क्षेत्राकडे बघितलं, त्याचा विचार करता आता भीती वाटू लागली आहे. एकीकडे बॉलीवुड आशयप्रधान होत असताना मराठी माध्यमं का आशयापासून दूर जाऊ लागलीत. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत असं जे म्हणतोय, ते चांगले दिवस अजून आलेलेच नाहीत, असं मला वाटतं. जर खरोखरच चांगले दिवस आले तर त्या वेळी मला माध्यमांमध्ये काम करायला आवडेल. कारण माध्यमांची विद्यार्थिनी म्हणून माध्यमांची आलेली समज आणि महाविद्यालयामुळे झालेली माझी वैचारिक जडणघडण यामुळे आतापर्यंतच्या अभिनयप्रवासात मी चांगली कामगिरी करू शकले. माध्यमांचं (मीडियाचं) क्षेत्र कसं असतं याची पहिली ओळख महाविद्यालयात झाली होती. उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात बॅचलर ऑफ मास मीडिया करताना अॅडव्हर्टाझिंगमध्ये स्पेशलायझेशन केलं. तिथंच मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.
शब्दांकन : भक्ती परब