उत्तराखंडमध्ये तब्बल ३ हजार ५३८ मीटर उंचीवर वसलेले ‘केदारनाथ’ हे भगवान शिवशंकराचे मंदिर आहे. सामान्य माणसाला गौरीकुंड ते केदारनाथ धाम मंदिरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी ५ ते ६ तास लागतात. या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. अनेक भाविकांना एवढा मोठा प्रवास पायी करणे शक्य होत नाही, म्हणूनच मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा घोडा किंवा खेचर अशा प्राण्यांचा आधार घेतला जातो. मात्र, माणसाचे वजन घेऊन १६ ते १७ किलोमीटरचा प्रवास करणे प्राण्यांनाही झेपत नाही. प्रसंगी अनेक प्राणी प्रवासादरम्यान मरण पावतात, याबाबतचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणी लक्ष घालून अभिनेत्री करिश्मा तन्नाने केदारनाथला जाणाऱ्या लोकांना आवाहन करीत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा : Video : “जीजू कैसे हैं?” पापाराझींचा प्रश्न ऐकून कियारा अडवाणी काहिशी लाजली अन् म्हणाली…
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्ना म्हणते, “जेव्हा स्वत:च्या पाठीवर बसवून तुम्हाला हे प्राणी तीर्थयात्रेला घेऊन जातात तेव्हा त्यांना अत्यंत त्रास होतो. कधीकधी हे घोडे व्याकूळ होऊन किंचाळतात…या प्राण्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही का? तुम्ही केदारनाथचे दर्शन घेत असताना कोणा दुसऱ्याचा जीव जात आहे हे तुम्हाला दिसत नाहीये का? या मूकजीवांचा वापर त्यांच्या जन्मापासून ते मृत्यू होईपर्यंत केला जातो हे पाहून तुम्ही गप्प कसे राहता? चारधाम यात्रेदरम्यान ज्या घोड्याचा जीव जातो त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त लाचार आहात.”
करिश्मा व्हिडीओमध्ये पुढे सांगते, “तीर्थयात्रेला जाऊन तुम्ही हे पाप करून परत येताय…आता तरी जागे व्हा आणि स्वत:च्या पायाने चालत जाऊन देवदर्शन करा. या प्राण्यांच्या वेदना एकदा जवळून जाणून घ्या…शांत बसू नका मी पुष्कर सिंह धाम यांना आवाहन करते की, आमच्या पवित्र देवभूमीला हजारो मृत घोड्यांचे स्मशान होण्यापासून वाचवा!”
व्हिडीओ शेअर करून करिश्माने देवदर्शनाला पायी प्रवास करा असे आवाहन भाविकांना केले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये करिश्मा लिहिते की, “आजच्या काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांचा दुरुपयोग होतोय हे खरंच धक्कादायक आहे. केदारनाथमध्ये दरवर्षी शेकडो घोड्यांना मरण येत आहे. तुम्ही काहीच बोललात नाही, तर यात बदल होणार नाही. प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहून याविषयी जनजागृती करावी.” दरम्यान, अशा गंभीर विषयाची दखल घेतल्यामुळे नेटकरी कमेंट करून अभिनेत्रीचे कौतुक करीत आहेत.