छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘एफआयआर’ या मालिकेतील अभिनेत्री कविता कौशिकने नुकतंच तिचं फेसबुक अकाऊंट डिलीट केलं आहे. फेसबुकवर येणाऱ्या अश्लील आणि चुकीच्या कमेंट्समुळे तिने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. कविताला येणाऱ्या या कमेंट्सविषयी तिने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रारही दाखल केली आहे.
‘एफआयआर’ या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री गेल्या काही दिवसापासून फेसबुकवरील कमेंट्समुळे त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. कविताने फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोबरोबर छेडछाड होत असून हे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करण्यात येत असल्याची शक्यता तिने वर्तविली आहे. या प्रकाराविरुद्ध तिने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करुन फेसबुकचं अकाऊंटचं डिलीट केलं आहे.
दरम्यान, कविताने फेसबुक अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने फेसबुकमुळे वेळेचा अपव्यय होत असल्याचं म्हटलं आहे. ‘गेल्या अनेक दिवसापासून मी या समस्येला तोंड देत आहे. मात्र सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र हे प्रमाण आता वाढत आहे. प्रत्येकाला अटेंशन हवं आहे. त्यामुळे ते मला असा त्रास देत आहे. पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि यामुळेच मी फेसबुकवरुन काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर हा निर्णय मी यापूर्वीच घ्यायला हवा होता. पण ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाही, असं कविता म्हणाली.