अभिनेत्री केतकी चितळे ही सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या वक्तव्यांमुळे ती अनेकदा अडचणीत येताना दिसते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केतकी चितळेने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मात्र तिने कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाबद्दल काहीही भाष्य न केल्याने अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आता तिने उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातून नागरिक येत असतात. तर अनेक राजकीय नेतेमंडळी सोशल मीडियावर पोस्ट करत मानवंदना देत असतात. केतकी चितळेने नववर्षाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र तिने कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाबद्दल पोस्ट न केल्याने एका नेटकऱ्याने संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “कालीमातेला दारुचा नैवेद्य असतो तर शंकराच्या मंदिरात…” केतकी चितळेचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

“तमाम भारतीयांना भिमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यावर केतकीने तिला सडेतोड उत्तर दिले आहे.

“भिमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?! ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी धर्मद्रोही वाटते, किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमके काय?” असा प्रश्न तिने यावर उत्तर देताना उपस्थित केला आहे.

आणखी वाचा : केतकी चितळेने हातावर गोंदलेल्या टॅटूचा संबंध थेट शरद पवारांशी, अर्थ सांगत म्हणाली “ते अंक म्हणजे…”

काय आहे कोरेगावचा इतिहास?

पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते. तरीही महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केला. महार रेजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर महार समाजातील सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला.

महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ketaki chitale comment on bhima koregaon battle anniversary reply to netizens nrp