डिजिटल काळातील तरुण पिढीची प्रेमकथा हा खरंतर ‘लवयापा’चा विषय आहे. ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं…’ हे निदान या पिढीच्या बाबतीत तरी पूर्णपणे खरं म्हणता येणार नाही. या पिढीचं आयुष्यच मुळात मोबाइल आणि अन्य डिजिटल आयुधांशी जोडलं गेलेलं असल्याने प्रेमात पडल्यावर जोडीदाराचा खरेखोटेपणा ताडून पाहायचा तर प्रत्यक्ष परीक्षेपेक्षा त्यांच्या मोबाइलच्या अंतरंगात शिरूनच काही तळ गाठता येणं शक्य आहे. ‘लवयापा’ चित्रपटाच्या या विषयातच त्याची खरी गंमत दडलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लवयापा’ हा अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन असलेला तिसरा चित्रपट. अद्वैतने दिग्दर्शित केलेला ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट खूप सुंदर होता. त्यानंतर २०२२ साली त्याचे दिग्दर्शन असलेला ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपट सपशेल आपटला आणि अभिनेता आमिर खानने काही काळ पडद्यापासून थोडं लांब राहण्याचा निर्णय घेतला. अद्वैतच्या या नव्या ‘लवयापा’ चित्रपटात आमिरच्या मुलाचा जुनैद खानचा नायक म्हणून प्रवेश झाला आहे. आणि अभिनेत्री खुशी कपूर त्याच्या नायिकेच्या भूमिकेत आहे. विषयानुरूप नवी जोडी हे या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. पण वर म्हटलं तसं खरी गंमत चित्रपटाच्या विषयात आहे आणि नाही म्हटलं तरी अगदी आजच्या पिढीच्या आयुष्याशी जोडले गेलेले विषय देण्यातही हिंदीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी एक पाऊल पुढे आहे. ‘लवयापा’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह टुडे’ या तमिळ चित्रपटावर आधारित आहे. सध्याच्या काळात जेन झी म्हणून ओळखली जाणारी तरुण पिढीच नव्हे तर सध्या चाळिशी-पन्नाशीत असलेल्या पिढीसह सगळ्या जणांचं आयुष्य हे मोबाइलमध्ये कैद आहे. माणूस प्रत्यक्षात जसा दिसतो, बोलतो ते जणू हिमनगाचं एक टोक असावं आणि त्याच्या मनातली खरी खळबळ ही त्या मोबाइलच्या आत दडलेली असावी, अशीच सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या चित्रपटाचा नायक गौरव ऊर्फ गुची आणि नायिका बानी या दोन प्रेमवीरांचा विषय लग्नापर्यंत येतो. तेव्हा बानीचे वडील दोघांनाही एका दिवसासाठी आपापले मोबाइल एकमेकांना देण्याचे आव्हान देतात. दोघांनीही आपापल्या जोडीदाराच्या मोबाइलमध्ये काय काय आहे हे तपासायचं आणि ते पाहून, अनुभवून झाल्यानंतरही दोघं एकत्र राहिले तर लग्न करून देऊ, असं बानीचे वडील दोघांनाही सांगतात आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमाची, पर्यायाने आयुष्याचीच परीक्षा सुरू होते.

विनोदी ढंगातली हलकीफुलकी प्रेमकथा असं या चित्रपटाचं स्वरूप आहे. त्याला कुठेही धक्का न लावता दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी त्यांच्या प्रेमाचा खेळखंडोबा कसा होतो, याची गमतीशीर मांडणी केली आहे. अद्वैत यांच्या दिग्दर्शनाची शैली ही काहीशी नेहमीच्या चकाचक बॉलीवूड मसालापटांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे म्हटलं तर ही प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटेल अशी मांडणी आहे, मात्र दुसरीकडे विनोदी असली तरी प्रेमकथा असल्याने त्याच्यात किमान एक-दोन प्रेमाची गाणी असायला हवीत. तशी ती आहेत. या चित्रपटाच्या मुख्य कथेबरोबर आणखी एक उपकथा यात आहे ती गौरवच्या बहिणीची किरणची. किरण आयुष्याचा जोडीदार म्हणून दातांचा डॉक्टर असलेल्या अंशुमनची निवड करते. गोल गरगरीत प्रकृतीच्या अंशुमनचा मोकळाढाकळा, समोरच्यांना नकळत जपण्याचा, समोरच्याचा मान ठेवून वागण्याचा स्वभाव किरणला आवडतो. अर्थात, प्रेमाच्या नात्यात विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. त्या विश्वासाच्या कसोटीवर गौरव-बानी आणि किरण-अंशुमन यांची प्रेमकथा खरी उतरते का? हे पाहणं रंजक ठरतं.

अभिनेता म्हणून जुनैदचा हा दुसरा चित्रपट आहे, मात्र खऱ्या अर्थाने प्रेमी हिरो म्हणून आणि चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा त्याचा पहिलाच चित्रपट म्हणता येईल. त्याच्या बाबतीत आमिरशी तुलना होणं स्वाभाविक आहे, मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वापासून ते संवादफेकीपर्यंत सगळ्याच गोष्टीत जुनैद वेगळा आहे. ‘महाराज’मध्ये त्याची व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी होती, इथे प्रेमकथेचा नायक म्हणून तो काहीसा अवघडल्यासारखा वाटतो. त्याच्या तुलनेत खुशी कपूर बानी म्हणून अगदी सहजतेने वावरली आहे. या दोघांबरोबरच किरणच्या भूमिकेत तन्विका परळीकर आणि डॉ. अंशुमनच्या भूमिकेत किकू शारदा यांच्या जोडीनेही छान काम केलं आहे. आशुतोष राणा हे बानीच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यांचा दबदबा जाणवेल अशी भूमिका चित्रपटात आहेच, मात्र तुलनेने त्यांचा फारसा उपयोग केलेला नाही. शीर्षकगीत वगळता गाणी फारशी श्रवणीय नाहीत. त्यामुळे केवळ कथाविषयाच्या जोरावर आणि हलकीफुलकी मांडणी असलेला आजच्या काळाचा प्रेमपट म्हणून ‘लवयापा’ थोडंबहुत रंजन करतो.

लवयापा

दिग्दर्शक – अद्वैत चंदनकलाकार – जुनैद खान, खुशी कपूर, आशुतोष राणा, तन्विका परळीकर, किकू शारदा आणि गृशा कपूर.