प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आई झाली असून तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या बातमीने तिचे कुटुंबिय आणि मित्रमंडळी यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये तिने या चिमुकल्यांना जन्म दिला. क्रांतीने २०१७ साली आयआरएस अधिकारी समीर वानखेडेशी लग्न केलं. या दोघांनीही अगदी साध्या आणि गुपचूप पद्धतीने लग्न केलं होतं. काही दिवसापूर्वीच तिच्या घरी डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी तिने या सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर केले होते.
जत्रा’ सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं ‘ऑन ड्युटी २४ तास’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने ‘काकण’ या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. या गोड बातमीमुळे क्रांतीच्या वैयक्तिक आयुष्याची नवी इनिंग सुरु होणार असून तिच्या घरात सध्या अतिशय आनंदाचे वातावरण आहे. तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षावही होत आहे.