मनोरंजन सृष्टीतील कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे, तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. तिने आई-वडिलांसाठी लिहिलेल्या भावनिक पोस्टमुळे सध्या अभिनेत्री चर्चेत आहे.
क्रांती रेडकरने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, “माझ्या वडिलांचा ८४ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. ते त्यांच्या आयुष्यात प्राण ओतणाऱ्या बायकोसोबत होते. ते दोघे एकमेकांच्या आयुष्यात असल्याने त्यांच्या आयुष्याला पूर्णत्व येते. ज्या जगात लोकं आपल्या जोडीदाराला सहज सोडून देतात, त्या जगात ते आजही एकमेकांच्या बरोबर आहेत. आयुष्याचा हा प्रवास आजही ते एकमेकांच्या बरोबरीने आनंदाने आणि प्रेमाने करत आहेत. मी तुझ्याबरोबर म्हातारा होईन असे जे काही म्हणतात, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझे आई-वडील आहेत. जेव्हा मला माझ्या आयुष्यातील उत्तम गोष्टी आठवतात, तेव्हा मला माझे आई-वडील आठवतात. प्रत्येक दिवशी देवापुढे नतमस्तक होते तेव्हा माझे पालक आजही माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद देते, देवाचे मी आभार मानते. अशा या अद्भूत व्यक्ती माझे आई-वडील आहेत, याबद्दल मनापासून कृतज्ञ आहे”, असे म्हणत क्रांतीने आपल्या पालकांविषयी प्रेम व्यक्त करणारी भावूक पोस्ट लिहिली आहे.
आता अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनीदेखील कमेंट करत क्रांतीच्या आई-वडिलांच्या जोडीचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने म्हटले आहे की, ‘आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच मोठं भाग्य आहे. आपल्याला हे पाहता येते यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही, असाच गोडवा कायम राहू देत’, दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे की, ‘सगळ्यांना असं जोडीदाराचं सुख मिळो’, तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आलं असंही म्हटले आहे.
दरम्यान, क्रांती रेडकर ही मराठी अभिनेत्री, दिग्दर्शक आणि लेखिका आहे. २००० साली ‘तिने सून असावी अशी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र, ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले. याबरोबरच, क्रांती सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच चाहत्याने केलेल्या कमेंटमधले मराठी शब्द सुधरवल्याने ती मोठ्या चर्चेत आली होती. याबरोबरच अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकींबरोबर बोलत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.