सुप्रसिद्ध अभिनेत्री लिसा रे २००९मध्ये कर्करोगाशी सामना करावा लागला. या आजारामुळे ती पूर्णपणे खचून गेली होती. इतकंच नव्हे तर तिला तिच्या पायांवर उभं राहणंही कठीण झालं. पण उत्तम औषधोपचार केल्यानंतर लिसा या आजाराशी सामना करू शकली. आज ती एकदम फिट आहे. सोशल मीडियाद्वारे व्यायाम करतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. २०१२मध्ये तिने लग्नही केलं. तिला दोन जुळ्या मुली आहेत. पण कर्करोगाशी सामना करत असताना तिला कोणत्या कठिण प्रसंगांचा सामना करावा लागला? याबाबत लिसाने भाष्य केलं आहे.
‘Official Humans of Bombay’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लिसा म्हणाली की, “केमोथेरपी झाल्यानंतर मी एका ट्रव्हल शोमध्ये सहभागी झाले. यादरम्यान माझे केस अगदी छोटे होते. मी या हेअर कटला ‘किमो कट’ असं नावही दिलं होतं. पण ज्या वाहिनीवर मी हा शो करत होते त्यांनी माझ्या जागी दुसऱ्या एका अभिनेत्रीला घेतलं. कारण त्यांना लांब केस असलेली मुलगी हवी होती. माझ्यासाठी हा प्रकार फारच धक्कादायक होता.”
“त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी मी सगळ्यांसमोर आले. सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या. माझं लग्नही होणार होतं. मी मेडिटेशन केलं. ज्युस, मोड आलेले कडधान्य खात होते. माझं शरीर पूर्ण आतून पोकळ झालं होतं. पण मी कर्करोगाशी हिंमतीने सामना केला. स्टेम सेल सर्जरी मी केली. आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. आता मी कर्करोग मुक्त झाली आहे.”
पुढे ती म्हणाली, “या ९ वर्षांमध्ये खूप काही बदललं आहे. या वर्षांमध्ये मी चित्रपट केले. पुस्तक लिहिलं. कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून त्यासाठीही काम केलं. मी दोन जुळ्या मुलींनाही जन्म दिला. एक आजार आपल्याला मृत्युच्या दारामध्ये कशाप्रकारे उभा करतो हे मी स्वतः अनुभवलं आहे.” लिसा आता तिच्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे. तसेच स्वतःच्या फिटनेसकडे व निरोगी आयुष्याकडे अधिकाधिक लक्ष देत आहे.