महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधत एका नव्या चित्रपटाची महाघोषणा केली आहे. ‘वीर दौडले सात’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचे नवीन पोस्टरही समोर आले आहे. या चित्रपटाची कथा तडफदार सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे. ‘म्यानातुन उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात…’, हे गाणं त्यांच्यावरच लिहिण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टरही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरवर ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाचे नाव पाहायला मिळत आहे. “इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी २०२३”, असे त्यांनी यात म्हटले आहे.
‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून हृता दुर्गुळेची एक्झिट, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग म्हणून गडहिंग्लजला ओळखले जाते. याच भागाच्या उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राज्याचे शेवटचे टोक. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आत्म बलिदान देत इतिहास अजरामर केला होता. याच सर्व लढाईवर हा चित्रपट साकारला जाणार आहे.
प्रतापरावाचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ताम्हाणे तर्फ गोरेगाव होते. प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी असे होते. ते शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून सुरुवातीला काम करत. त्यानंतर पराक्रमाच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांना स्वराज्याचे सरनोबत करण्यात आले. कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना ‘प्रतापराव’ असा किताबही देण्यात आला. प्रतापरावांनी वादळ वेगाने झंझावत कार्य करून गनिमांना जेरीस आणले होते. मात्र उमराणीच्या लढाईत प्रतापरावांकडून अभय मिळालेला बेहेलोल खान पुन्हा शिवरायांच्या भूमीत शिरुन उपद्रव करू लागला होता.
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असताना बेहेलोल खान हा पुन्हा-पुन्हा स्वराज्यावर चालून येत होता. त्यानंतर छत्रपती शिवरायांनी वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका’ असे आदेश प्रतापरावांना दिले होते. छत्रपती शिवराजयांचा खलिता हाती पडताच त्यांचे रक्त सळसळू लागले. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या महाराजांचा हुकूम पाळायचा या एकाच उद्देषाने प्रतापराव गुर्जर हे फक्त ६ शिलेदारांसह नेसरी खिंडीत शिरले. त्या ठिकाणी शेकडो सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बेहेलोल खानाच्या सैन्यांवर ते तुटून पडले. महाशिवरात्रीचा तो संपूर्ण दिवस होता. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देत नेसरी खिंड पावन केली.
प्रतापरावांच्या याच पराक्रमावर कवी कुसुमाग्रज यांनी एक गीत लिहिले होते. “म्यानातुन उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात…” असे त्यांच्या गीताचे बोल होते. आजही हे गीत ऐकल्यावर अंगावर शहारे येतात आणि आपले रक्त संचारते. या गीतानंतर आता प्रतापरावांचा इतिहास मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.