अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक महेश मांजरेकर हे नाव मराठीसह हिंदी सिनेसृष्टीसाठी काही नवीन नाही. महेश मांजरेकर यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट साकारण्याकडे त्यांचा विशेष कल असतो. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत त्यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली. ‘वीर दौडले सात’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिले पोस्टर शेअर केले होते. त्यानंतर नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत टीझर शेअर केला आहे. “छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर दौडले सात”, असे त्यांनी हा टिझर शेअर करताना म्हटले आहे.

छत्रपती शिवरायांच्या ‘या’ तडफदार सेनानीवर साकारणार महेश मांजरेकर आगामी चित्रपट

‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग म्हणून गडहिंग्लजला ओळखले जाते. याच भागाच्या उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राज्याचे शेवटचे टोक. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आत्म बलिदान देत इतिहास अजरामर केला होता. याच सर्व लढाईवर हा चित्रपट साकारला जात आहे.

या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचे चेहरे स्पष्ट होताना दिसत नाही. मात्र तडफदार सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटातील मुख्य भूमिकेत स्वत: महेश मांजरेकर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचे इतर सहा शिलेदार कोण याबाबत गुप्तता पाळली जात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत कोण दिसणार याबद्दल देखील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या या चित्रपटाचा टीझर चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे फक्त मराठी नव्हे तर हिंदीतही हा टीझर प्रदर्शित झाला आहे.

“न भूतो न भविष्यती, मराठीतील सर्वाधिक बजेटची कलाकृती…”, महेश मांजरेकरांकडून ‘महाराष्ट्र दिनी’ नव्या चित्रपटाची घोषणा

येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे. विशेष म्हणजे सध्या छत्रपती शिवरायांवर निर्मिती होत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये या चित्रपटाचीही भर पडणार आहे. या आधी महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.