मानसी जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्यार का दर्द है मिठा मिठा’, ‘इश्कबाझ’, ‘पवित्र रिश्ता’, ‘वोह अपना सा’, ‘पापा बाय चान्स’ या हिंदी मालिकोंमधून आपली ओळख निर्माण करणारी मराठमोठी अभिनेत्री मानसी साळवी आपल्याला ‘असंभव’मधील शुभ्रा म्हणूनच लक्षात राहते. हीच शुभ्रा आता तब्बल तेरा वर्षांनंतर मराठीत ‘काय घडलं  त्या रात्री’ या मालिकेतून पुनरागमन करते आहे. ३१ डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ती रेवती बोरकर या पोलीस अधिकाऱ्याची भूिमका साकारते आहे. या मालिकेविषयी मानसी सांगते, ‘काय घडलं त्या रात्री’ ही मालिका एका खून प्रकरणातील रहस्यावर बेतली असून, यात काही वेगळा आशय प्रेक्षकांना पाहण्यास मिळेल. एका प्रतिष्ठित व्यक्तीची हत्या होते आणि त्या हत्येचा तपास लावण्यासाठी रेवतीची नेमणूक केली जाते. आपल्या वर्दीशी एकनिष्ठ राहत पत्रकार, राजकारणी नेते यांना ती कशी सामोरी जाते, हे यात दाखवण्यात आले असल्याचे ती सांगते.

‘या भूमिकेसाठी मी महिला पोलीस अधिकाऱ्याचे वागणे, बोलणे, त्यांची देहबोली हे आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आधी मी ‘सद्रक्षणाय’ नावाचा चित्रपट केला होता. त्यामुळे रेवतीची भूमिका पडद्यावर साकारताना जड गेले नाही. मालिकेत मी साकारत असलेल्या भूिमकेला विविध पैलू आहेत. रेवती ही पोलीस अधिकारी आहे, तशीच प्रेमळ आईही आहे. आपले वैयक्तिक आणि खासगी जीवन सांभाळत कसे आयुष्याला सामोरे जाते याची ही कथा आहे. रोजच्या सासू-सुनेच्या नाटय़ापेक्षा प्रेक्षकांना काही तरी नवीन आशय पाहण्यास मिळेल’, असेही मानसी स्पष्ट करते.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर एका प्रदीर्घ विश्रांतीनंतर काम करताना थोडी मनात धाकधूक होतीच. मात्र शासनाने घालून दिलेले करोनाचे सर्व नियम पाळत चित्रीकरण सुरू झाले आहे. चित्रीकरण बंद झाल्याने यावर उपजीविका असलेल्या कलाकार – तंत्रज्ञ यांचा रोजगार बुडाला होता. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आहे. हात स्वच्छ धुणे आणि शिंकताना नाकावर रुमाल अथवा हात ठेवणे या साध्या गोष्टी आपण विसरलो होतो. करोनामुळे या गोष्टी पुन्हा नव्याने समजल्या. टाळेबंदीनंतर मी प्रथम जाहिरातीत काम करून पाहिले. मला हे काम जमतंय का याची चाचपणी केली, असे सांगताना तिने छोटय़ा पडद्यावरील बदल अधोरेखित केला. आधी हिंदीत गर्दी, लग्नसोहळ्याच्या दृश्यात पंधरा ते वीस लोकांची गरज भासत असे, मात्र सध्या मर्यादित लोकांना घेऊनच दृश्ये चित्रित केली जातात, असेही तिने सांगितले.

मुलीला अप्रूप 

मानसीला ओमीषा ही तेरा वर्षांची मुलगी आहे. ओमीषाने माझे मराठीतील काम पाहिलेले नाही. या मालिकेबद्दल सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला. आज मला टीव्हीवर पाहून तिलाही अप्रूप वाटते. यूटय़ूबवर माझे हिंदी तसेच मराठी मालिकेतील जुने व्हिडीओ ती पाहते. तिच्या वेळेस गरोदर असताना मी ‘असंभव’ ही मालिका सोडली होती. आता ती थोडी मोठी झाल्याने आईने माझ्यामुळे चांगली मालिका सोडली याचे तिला दु:ख आहे. त्यामुळे ती मला नेहमी काम करण्यासाठी प्रोत्साहन देते, असेही मानसीने सांगितले. टाळेबंदीमुळे घरी असल्यामुळे तो वेळ ओमीषासोबत घालवता आला. या कालावधीत आम्ही दोघींनी यूटय़ूबवर पाहून रोज नवीन पदार्थ तयार केले, असे ती सांगते.

‘असंभव’ मधील शुभ्रा..

‘असंभव’ मधील शुभ्रा या भूमिकेने मानसी साळवी घराघरात पोहोचली. मानसीने साकारलेली शुभ्रा ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की, तेरा वर्षांनंतरही प्रेक्षक तिला याच भूमिके साठी ओळखतात. आजही मी कुठे चंद्रकोर लावून गेल्यावर मला लोक शुभ्रा म्हणूनच ओळखतात. या तेरा वर्षांत प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केले. या मालिकेचे चित्रीकरण करत असताना मी तीन महिन्यांची गरोदर होते. आज माझी मुलगी ओमीषा १३ वर्षांची आहे. पण त्या मालिके च्या आठवणी आजही कायम मनात आहेत. मालिके तील त्या वेळी उत्कृष्ट सहकलाकारही मला लाभले होते. तेव्हाची शुभ्रा २३ वर्षांची होती आणि आताची रेवती बोरकर चाळिशीच्या पुढची दाखवली आहे. या दोघींमध्ये दोन पिढय़ांचे अंतर आहे, असे ती सांगते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mansi salvi in new marathi serial kay ghadla tya ratri on zee marathi zws