अनेक गाजलेल्या मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. उत्तम अभिनय आणि गोड स्वभाव यामुळे मितालीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केली आहे. त्यामुळे आज तिचा असंख्य मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे मिताली आता केवळ अभिनेत्रीच राहिली नसून ती डॉग कम्युनिकेटरदेखील झाली आहे.आपल्या लाडक्या डोरासोबत बोलता यावं, तिच्या मनातले भाव समजून घेता यावेत यासाठी मितालीने खास प्रशिक्षण घेतलं आहे. या प्रशिक्षणामुळे सध्या लॉकडाउनच्या काळात मिताली आणि डोराचा अबोल संवाद सुरु असल्याचं मितालीने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलतांना सांगितलं.
“मला लहानपणापासून मुक्या प्राण्यांची प्रचंड आवड आहे. कुत्रा किंवा मांजरच नव्हे तर इतरही प्राणी मला तितकेच आवडतात. त्यामुळे त्यांच्याविषयी कायम एक कुतूहल मनात होतं. त्यांच्या मनात काय चाललं आहे किंवा ते काय विचार करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होतं. त्यातच अॅनिमल कम्युनिकेशन किंवा नेचर कम्युनिकेशविषयी मी ऐकलं होतं. पण त्याचं नेमकं स्वरुप माहित नव्हतं. मात्र डोराच्या चौथ्या वाढदिवशी मला अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या मुलीविषयी म्हणजे सोहा कुलकर्णीबद्दल समजलं. तीदेखील अॅनिमल कम्युनिकेटर आहे. त्यानंतर मी सोहाशी बोलले आणि त्यातून मला या संकल्पनेविषयी नेमकी माहिती मिळाली. याच काळात सोहा माझ्याशी आणि डोराशीदेखील बोलली होती. विशेष म्हणजे ती डोराशी बोलत असताना मला एका गोष्टीची जाणीव झाली की खरंच आपण प्राण्यांशी संवाद साधू शकतो”,असं मिताली म्हणाली.
पुढे ती म्हणते, “खरं तर प्राण्यांशी बोलण्यासाठी कोणत्या अलौकिक शक्तीची, ठराविक भाषा किंवा सांकेतिक भाषेची गरज नसते. तर भावनिकरित्या तुम्ही प्राण्यांशी किती जोडले आहात यावर ते अबलंबून असतं. मात्र प्राण्यांच्या मनातलं ओळखायचं कसं हे जाणून घेण्यासाठी मी पुण्यातील मंजिरी लाटे यांच्याकडून ऑनलाइन प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणामुळे डोरा आणि माझ्यातील संवाद सुकर झाला आहे.
दरम्यान, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मितालीकडे पाहिलं जातं. ‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.