बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. या सगळ्याची सुरुवात झाली आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटापासून. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हा ट्रेंड इतका व्हायरल झाला की आमिरच्या करकीर्दीतला हा चित्रपट सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला. याच संदर्भात या चित्रपटात महत्त्वाची म्हणजेच लाल सिंगच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री मोना सिंग हिने वक्तव्य केलं आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना मोनाने वक्तव्यं केलं की, “तुम्ही या चित्रपटाला हीट किंवा फ्लॉप असं बिरुद लावू शकत नाही.” आमिर खान, करीना कपूर, मोना सिंग, नागा चैतन्य अशा कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध असा हा ‘लाल सिंह चड्ढा’ हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. चित्रपटगृहात जास्त कमाई न करू शकल्याने आमिरचा हा चित्रपट आता लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे.
यामध्ये मोना सिंगने अत्यंत महत्ताची भूमिका साकारली होती. नुकतंच तिने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत याविषयी वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली, “लवकरच नेटफ्लिक्सच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यांचा या चित्रपटाकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असेल. हीट आणि फ्लॉप असं लेबल लावायला हा काही घाईगडबडीत उरकलेला चित्रपट नाही. हा चित्रपट पाहून लोकांवर त्याचा प्रभाव बराच काळ राहील. इतक्या सुंदर चित्रपटाचा मी एक छोटासा भाग आहे याचा मला आनंद आहे.”
आणखी वाचा : सुकेशच्या गुन्ह्यांबद्दल ठाऊक असूनही जॅकलिन करणार होती त्याच्याशी लग्न; चौकशीदरम्यान उघडकीस आलं सत्य
मोना सिंग आता एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून लोकांच्या समोर येणार आहे. ‘जस्सी जैसी कोई नही’पासून तिचा सुरू झालेला प्रवास हा फारच अविस्मरणीय आहे. तिने साकारलेलं लाल सिंगच्या आईचं पात्र हे प्रेक्षकांना पसंत पडलं आहे. बहुचर्चित चित्रपट असूनही ‘लाल सिंह चड्ढा’ने पहिल्या पाच दिवसात फक्त ४५ कोटी इतकीच कमाई केली होती. या चित्रपटाच्या अपयशामुळे अभिनेता आमिर खानलाही चांगलाच धक्का बसला आहे.