अभिनेत्री निर्मिती सावंत दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा ‘श्री बाई समर्थ’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. नाटय़ निर्माते दिलीप जाधव यांच्या ‘अष्टविनायक’ या नाटय़संस्थेतर्फे नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. नाटकाचे लेखक व दिग्दर्शक राजेश देशपांडे असून नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २४ जुलै रोजी सादर होणार आहे.
‘जाऊ बाई जोरात’, ‘श्यामची मम्मी’, ‘कुमारी गंगुबाई मॅट्रिक’, ‘बंटी की बबली’ अशा नाटकांमधून आपल्या समर्थ अभिनयाची वेगळी निर्मिती सावंत यांनी पाडली आहे. श्री बाई समर्थ’ या नाटकाचे मूळ गुजराथी लेखक अनुराग प्रपन्ना हे आहेत. या नाटकात निर्मिती सावंत यांच्यासह अभिनेते अरुण नलावडे, समीर चौघुले, मनमीत पेम, वनिता खरात यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘श्री बाई समर्थ’ या नाटकात सर्वसामान्य गृहिणीच्या बंडाची कथा मांडण्यात आली आहे. घरातली सर्व प्रकारची कामे करणाऱ्या आणि जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या गृहिणीने तिच्या न्याय्य हक्कासाठी केलेले बंड आणि दिलेली न्यायालयीन लढाई यात मांडण्यात आली आहे. नवऱ्याचा पुरुषी अहंकार या गृहिणीला अस्वस्थ करत असतो. आपल्या कष्टाचे, कामाचे कौतुक व्हावे, सन्मान मिळावा अशी तिची अपेक्षा असते. एके दिवशी तिच्या सहनशिलतेचा अंत होतो आणि यापुढे माझ्या कामाचा मोबदला जोपर्यंत मला मिळत नाही, तोपर्यंत आपण घरातील एकही काम करणार नाही, अशी भूमिका ती गृहिणी घेते आणि यातून जे काही घडते ते ‘श्री बाई समर्थ’मध्ये दाखविले आहे.
या नाटकाला शीर्षक गीत असून ते निषाद गोलांबरे यांनी लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा