अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी मालिकांमुळे नावारुपाला आली. आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेते. बहुचर्चित ‘रानबाजार’ वेबसीरिजसाठी देखील तिने खूप मेहनत घेतली. या सीरिजमधल्या भूमिकेसाठी तिने वजन वाढवलं. शिवाय धूम्रपानच्या विरोधात असताना तिला भूमिकेची गरज म्हणून हाती सिगारेट घ्यावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – VIDEO : “मेट्रोमध्ये खाण्यावर बंदी अन् तुम्ही…” मेट्रो प्रवासात वडापाव खाल्ल्याने कियारा-वरुण ट्रोल

प्राजक्ता ‘वाय’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त प्राजक्ताने लोकसत्ता.कॉमशी खास बातचीत केली. यावेळी तिने ‘रानबाजार’ वेबसीरिजमधील आपल्या भूमिकेबाबत सांगितलं. ‘रानबाजार’मधील भूमिकेसाठी तुला खरंच धूम्रपान करावं लागलं का? असं प्राजक्ताला यावेळी विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “मी धूम्रपानच्या विरोधात आहे. दारुचं व्यसन मी कधी केलं नाही. किंवा सिगारेटचं व्यसनही कधी मला नव्हतं आणि आजही ते नाही. पण भूमिकेची गरज म्हणून मला सीरिजमध्ये सिगारेट ओढावी लागली. दारुचं सेवन करायची मला गरज भासली नाही. मला अशाप्रकारचं व्यसन कधीच लागू नये अशी मी देवाकडे प्रार्थना करते.”

पुढे बोलताना ती म्हणाली, “कारण व्यसनाचा परिणाम तुमच्या निरोगी शरीरावर होतो. योगा, प्राणायमचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यामुळे मी व्यसनांपासून दूर आहे. सगळ्यांना मी हेच सांगू इच्छिते की तुम्ही पण धूम्रपानापासून लांब राहा. पण भूमिकेसाठी जे करायचं आहे ती माझी गरज आहे. माझं हे प्राथमिक काम आहे. कारण मी एक अभिनेत्री आहे. अजूनही कोणी माझ्या जवळपास सिगारेट ओढत असेल तर मी चार पावलं लांबच जाते.”

आणखी वाचा – ‘ब्रम्हास्त्र’ सुपरहिट की फ्लॉप?, चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “हा चित्रपट तर…”

‘रानबाजार’मधील प्राजक्ताच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आता तिचा ‘वाय’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्टर, टीझर, ट्रेलर चांगलंच चर्चेत आहे. सत्य घटनांवर आधारित ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता बर्वे देखील मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress prajakta mali talk about her role in raanbaazaar webseries and say no to smoking kmd