मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. ‘काकस्पर्श’, ‘वजनदार’, ‘टाइम प्लीज’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘टाइमपास २’ यासारखे हिट चित्रपट ‘आभाळमाया’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमध्ये प्रियाने दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता ती आणखी एक भूमिका साकारणार आहे. मात्र, ही भूमिका ती ‘रील लाइफ’मध्ये नाही तर ‘रिअल लाइफ’मध्ये साकारेल.
वाचा : गंभीर दुखापतीमुळे मराठमोळ्या अभिनेत्याची प्लास्टिक सर्जरी
प्रियाच्या आयुष्यात एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. या चिमुकलीच्या आगमनामुळे तिचा आनंद गगनात मावत नसून, तिने आपल्या चाहत्यांसोबत हा आनंद ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला. प्रियाने तिच्या भाचीसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या भाचीचे नाव शरिवा असून, तिच्या चिमुकल्या हातांमध्ये प्रियाने आपले बोट दिल्याचे फोटोत दिसते. फोटोला कॅप्शन देत प्रियाने लिहिलं की, ‘माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबतचा खास क्षण’. यासह तिने #neice #love #shariva हे हॅशटॅग्जही दिले आहेत.
वाचा : प्रार्थनाच्या लगीनघाईपासून अक्षया देवधरच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीपर्यंत..
सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्रिया नेहमी तिच्या चाहत्यांना आपल्या आगामी चित्रपटांबद्दल आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दलही माहिती देते. लवकरच ही अभिनेत्री तुम्हाला ‘गच्ची’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत ‘वेब सेन्सेशन’ अभिनेता अभय महाजन मुख्य भूमिकेत दिसेल. विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट गच्चीवरच चित्रीत झालेला असून, त्याचे दिग्दर्शन नचिकेत सामंत यांनी केलेय. येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेली ‘गच्ची’वरील ही गोष्ट सिनेरसिकांना मनोरंजांची मोठी मेजवानी देऊन जाईल यात शंका नाही.