Ranya Rao gold smuggling updates :कन्नड अभिनेत्री रान्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. रान्या हिला सोमवारी रात्री बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईतून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिच्याजवळ १५ किलो सोनं आढळलं. या सोन्याची किंमत जवळपास १२.५६ कोटी रुपये आहे. या प्रकरणी तपासात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
रान्या राव ही कर्नाटकचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्याने गेल्या वर्षभरात ३० वेळा दुबईला प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या प्रत्येक प्रवासात तिने अनेक किलो सोनं भारतात आणल्याचं समजतंय. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रान्याला सोन्याची तस्करी करण्यासाठी प्रति किलो १ लाख रुपये दिले जात होते. ती एका ट्रिपमधून सुमारे १२-१३ लाख रुपये कमवत होती.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रान्या राव सोन्याच्या तस्करीसाठी प्रत्येकवेळी मॉडिफाय केलेले जॅकेट आणि कंबरेचे बेल्ट वापरत होती. डीआरआय अधिकाऱ्यांनी तिला अटक केली, तेव्हाही तिने हेच मॉडिफाय जॅकेट घातले होते आणि त्यात सोनं लपवलं होतं.
Chhaava: ‘छावा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, एकूण कलेक्शन किती? वाचा…
रान्या रावने पोलिसांना काय सांगितलं?
रान्या राव वारंवार दुबईला जात होती, त्यामुळे ती मागील काही काळापासून अधिकाऱ्यांच्या रडारवर होती. बुधवारी ती विमानतळावर आली, तेव्हा सिक्युरिटी चेकिंगदरम्यान तिला डीआरआय अधिकाऱ्यांनी अडवलं.
अनुराग कश्यप मुंबई सोडून या ठिकाणी झाला स्थायिक, बॉलीवूडचा ‘Toxic’ उल्लेख करत म्हणाला, “इथले लोक…”
त्यावेळी रान्याने अधिकाऱ्यांना सांगितलं की ती आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची मुलगी आहे. राव हे कर्नाटक राज्य, पोलीस गृहनिर्माण महामंडळात पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून कार्यरत आहेत. पण अधिकाऱ्यांना रान्याबद्दल गुप्त माहिती मिळाली होती, त्यामुळे तिची झडती घेऊन तिला अटक करण्यात आली. चौकशीत तिच्याकडे जवळपास १५ किलो सोनं आढळलं. या सोन्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
रान्याचे वडील रामचंद्र राव यांची प्रतिक्रिया
“माध्यमांमधून जेव्हा मला याबद्दल समजलं तेव्हा मलाही धक्का बसला. मला यापैकी काहीच माहीत नव्हतं. हे सर्व ऐकूण मलाही इतर कोणत्याही वडिलांप्रमाणे धक्का बसला,” असं राव म्हणाले. तसेच रान्या वेगळी राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. “काही कौटुंबिक कारणांमुळे ती वेगळी राहते. पण कायदा कायद्याचं काम करेल. मला या घटनेबाबत आता अधिक बोलायचं नाही”, असं राव यांनी नमूद केलं.