प्रपंच ही मालिका असो, खबरदार हा चित्रपट किंवा व्हाईट लिली नाईट रायडरसारखं नाटक… दिवंगत अभिनेत्री रसिका जोशीच्या अभिनयाचं नाणं खणखणीतच वाजायचं. मराठीतल्या या गुणी अभिनेत्रीने हिंदीतील मालामाल विकली, गायब, ढोल, भुलभुलैय्या या कॉमेडी चित्रपटांबरोबरच एक हसीना थी, वास्तुशास्त्र या गंभीर चित्रपटांमधील भूमिकांचे सोनं केलं. मराठी रंगभूमी, चित्रपट इतकेच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दर्जेदार व कसदार अभिनयाने छाप उमटविणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री रसिका जोशी यांचे वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी कर्करोगामुळे २०११ साली निधन झाले. त्यांचा आज तिसरा स्मृतीदिन आहे. दिग्दर्शक गिरीश जोशी यांच्या त्या पत्नी होत्या.
रसिका जोशी यांचे शिक्षण अ.भि.गोरेगावकर स्कूलमध्ये झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच आंतरमहाविद्यालयीन नाटयस्पर्धा त्यांनी गाजवल्या होत्या. पहिल्यापासूनच वेगळे काहितरी करण्यासाठी त्यांची धडपड असायची. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हळुहळू मराठी मालिका, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांपर्यंत पोचला होता. रसिका जोशी यांनी पंडीत सत्यदेव दुबे, विजयाबाई मेहता यांच्या नाटय शिबीरांमध्येही सहभाग घेतला होता. विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या लीलया साकारणा-या रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील तिची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील तिच्या भूमिका स्मरणीय होत्या. यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचे कथा आणि संवादलेखनही तिने केले होते. हिंदीत राम गोपाल वर्माच्या ‘ गायब ‘ मध्ये त्यांनी तुषार कपूरच्या आईची भूमिका केली . त्यानंतर प्रियदर्शनच्या’ मालामाल विकली ‘, ‘ भुलभुलय्या ‘ मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती . एनडीव्हीवरील ‘ बंदिनी ‘ यामालिकेत मोतीबेन साकारत असतानाच त्यांना कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते . अखेर ७ जुलै २०११ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

Story img Loader