अभिनेत्री रवीना टंडन सध्या चित्रपटसृष्टीपासून काहीशी लांब गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र, शनिवारी रात्री घडलेल्या एका प्रसंगामुळे रवीना टंडन चर्चेत आली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातील रिझवी कॉलेजजवळ रवीना टंडनची भररस्त्यात काही स्थानिकांशी बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही स्थानिकांनी रवीना टंडनला घेरल्याचं दिसून येत आहे. कार पार्किंगवरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल Video मध्ये नेमकं काय?

अभिनेत्री रवीना टंडनचा हा व्हिडीओ मोहसीन शेख नावाच्या एका व्यक्तीच्या इन्स्टाग्राम व ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रवीना टंडन काही व्यक्तींशी वाद घालत असल्याचं दिसत आहे. तसेच, काही व्यक्तींनी तिच्यासोबत धक्काबुक्कीही केल्याचं दिसत आहे. यावेळी झालेल्या वादात रवीना टंडन समोरच्या व्यक्तीला “तुम्ही मला असं ढकलू शकत नाही”, असं वारंवार सांगताना दिसत आहे. तसेच, समोरच्या व्यक्तीने पोलिसांना पाचारण करण्याचा इशारा देताच रवीना टंडनने मी पोलिसांना बोलावलं आहे, असं सांगितल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

रिझवी कॉलेजजवळ कार्टर रोडवरचा हा व्हिडीओ असल्याचं फ्री प्रेस जर्नलनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. रवीना टंडनच्या कारचालकाचा कार पार्किंगवेळी काही स्थानिकांना धक्का लागल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातून झालेल्या वादामध्ये नंतर रवीना टंडनही पडली आणि त्यातून तिचीही संबंधित स्थानिकांशी वादावादी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

रवीना टंडनच्या वडिलांचा मोठा सन्मान, मुंबईतील चौकाला दिलं रवी टंडन यांचं नाव, अभिनेत्री भावुक होत म्हणाली…

मारहाणीचा आरोप

दरम्यान, या प्रकरणी मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने रवीना टंडनने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हा व्हिडीओ देखील व्हायरल होत असून यासंदर्भात पोलीस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचा दावाही ही व्यक्ती व्हिडीओमध्ये करत आहे. दरम्यान, हे गाडीनं उडवल्याचं प्रकरण नसून कार पार्किंगमुळे वाद झाल्याचं असल्याचं सांगितलं जात आहे.

कुणीही जखमी नाही, पोलिसांची माहिती

या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, कुणालाही मारहाण झाली नसून शाब्दिक बाचाबाचीमुळे हा वाद वाढला. मात्र, कार पार्किंगमुळे निर्माण झालेला हा वाद आता मिटला आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.