गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध गुजराती असा वाद मुंबईत रंगतोय का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याची दोन कारणं आहेत. गिरगावातल्या एका कंपनीने नोकरीसंदर्भातली जी जाहिरात दिली त्यात मराठी नॉट वेलकम म्हटलं आहे. तर घाटकोपरच्या एका सोसायटीत गुजराती लोकांनी मराठी लोकांना प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांवर भाष्य करत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आहे.
काय म्हटलं आहे रेणुका शहाणेंनी?
“मराठी “not welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका.
मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका.”
“कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे.” अशी पोस्ट रेणुका शहाणेंनी केली आहे. ज्या पोस्टची चर्चा होते आहे.
रेणुका शहाणेंनी त्यांच्या पोस्टमध्ये आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, मराठी “Not Welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका असं आवाहन केलं आहे.. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका असंही म्हटलं आहे.
हे पण वाचा- गुजरातीबहुल सोसायटीत मराठी माणसाला नो एंट्री! गिरगावपाठोपाठ घाटकोपरमधील घटनेचा ठाकरे गटाकडून तीव्र निषेध
युजर्सनी या पोस्टबाबत काय म्हटलं आहे?
अभिनेत्री रेणुका शहाणेंनी जी पोस्ट केली आहे त्यावर अनेक नेटकऱ्यांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी विविध कमेंट केल्या आहेत. अनेकांनी रेणुका शहाणेंनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. एका युजरने मराठी भाषा मराठी संस्कृती व आपली मुंबई वाचवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आभार मानतो असे म्हटले आहे. तर, एका युजरने तुम्ही आमचे मन जिंकले असल्याचे सांगत तुम्ही तुमच्या पाठीचा कणा ताठ असल्याचे दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर, रेणुकाच्या या पोस्टलाही काहींनी विरोध केला आहे. आशुतोष राणा आणि तुम्ही मराठीत किती काम करतात? हे जरा सांगाल का? असा प्रश्न एकाने केला आहे. तर, काही युजर्सचा रोख हा भाजपविरोधात भूमिका का घेतली? त्या संबंधित कंपनीविरोधात का नाही असंही काहींनी विचारलं आहे.
गिरगावात नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री?
LinkedIn या नोकरीशी संबंधित वेबसाईटवर व्हायरल झालेल्या एका नोकरीच्या जाहिरातीमुळे मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ITCODE Infotech या कंपनीने ग्राफिक डिझायनर्सची जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत म्हटलं आहे की, मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. जान्हवी सराना या नावाने लिंक्डइनवर ही जाहिरात करण्यात आली. या जाहिरातीत मुंबईत ग्राफिक्स डिझायनरसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातील एका कार्यालयात ही नोकरी होती. तरीदेखील नोकरीच्या या जाहिरातीत मराठी लोकांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं.