छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. त्यात संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही घराघरात प्रसिद्ध आहे. रुपाली ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच रुपाली भोसलेला गंभीर दुखापत झाली आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर तिला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
रुपाली भोसलेने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर चित्रीकरणावेळी तिला दुखापत झाल्याची माहिती दिली आहे. रुपालीने शेअर केलेल्या या व्हिडीओत तिच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे. यात तिने तिच्या पायाला बँडेज पट्टी लावल्याचे पाहायला मिळत आहे. याला कॅप्शन देताना तिने आजच्या शूटदरम्यान दुखापत झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान यानंतर रुपाली भोसलेने ई टाइम्सशी बोलताना या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळी रुपाली म्हणाली की, “मी मिलिंद गवळी (अनिरुद्ध) सोबत एका सीनचे शूटिंग करत होते. यावेळी कथानकानुसार, अनिरुद्ध हा संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करत असतो आणि तो संजनावर ओरडतो. त्यानंतर मी रडते आणि खुर्चीवर बसते. आमचे दिग्दर्शक रवी यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितले होते. पण मला वाटले की मी जमिनीवर बसावे आणि आम्ही तो शॉट घेण्याचे ठरवले. हे चित्रीकरण करत असताना मी रडत होते आणि इतक्या जोरात खाली बसले की माझ्या पायाचे बोट पूर्णपणे वळले. त्यामुळे नख बाहेर आले. त्यामुळे त्यातून रक्त आले.”
“माझ्या पायाच्या नखाला लाल रंगाची नेलपॉलिश लावली होती. मला आधी वाटले की ते नेलपॉलिश आहे. पण नंतर मला तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे आम्ही चित्रीकरण थांबवले. त्यानंतर पायाला खूप गंभीर दुखापत झाल्याचे मला जाणवले”, असेही ती म्हणाली.
“मला त्यावेळी फार वेदना होत होत्या. चित्रीकरणाच्या सेटजवळ एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. काल रविवार असल्याने डॉक्टरकडे जाता आले नाही. कोणीही डॉक्टर उपलब्ध नव्हते. मला किती त्रास होतोय ते मी शब्दात सांगू शकत नाही. सध्या मी बरी आहे. यावेळी आम्ही कार्यक्रमाच्या सेटवर एका विशेष भागासाठी शूटींग करत होते. मी चांगली आहे. मी कार्यक्रमाचे शूटिंग थांबवलेले नाही. एखाद्या दुखापतीसह शूट करणे आणि त्यासोबत काम करणे फार कठीण असते. पण आता कार्यक्रमात खूप महत्त्वाचे भाग आहेत. त्यामुळे मी कुठेतरी त्याचे शूटींग करणे मॅनेज करत आहे”, असेही रुपालीने सांगितले.