मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडी ती चाहत्यांना सांगत असते. नुकतीच तिने एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.
आणखी वाचा : प्रसिद्ध गायिकेशी विमान कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक, ट्विटरवरून सांगितला अनुभव
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचा काल वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त तिने केलेली पोस्ट ही चर्चेचा विषय ठरत आहे. या वाढदिवसाला तिने स्वतःलाच एक मोठी भेट दिली आहे. ती म्हणजे, तिने स्वतःचं पहिलं घर घेतलं आहे. काल त्या घरी ती तिच्या कुटुंबियांसोबत गेली होती. त्यावेळचे काही फोटो तिने पोस्ट करत तिला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे तिने आभार मानले आहेत.
हे फोटो पोस्ट करत तिने लिहिले, “स्वतःचं घर. हॅप्पी बर्थडे टू मी. ही माझी माझ्या घराला दिलेली पहिली भेट. जेव्हा लोक विचारतात की, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा माझी आई म्हणाली, वय झालं म्हणून नाही तुला जेव्हा करावास वाटेल तेव्हा लग्न पण. पण त्या आधी स्वावलंबी हो, स्वतःचं घर घे. आई हे स्वप्न तू मला दाखवलस त्याबद्दल तुझे खूप आभार. मला माहित असलेली तू सर्वात कणखर व्यक्ती आहेस.
बाबा तुमच्या शिवाय हे शक्य झालं नसतं. आईने स्वप्न दाखवल पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून घेतली उडी. तुम्ही बापमाणूस आहात. भौतिक गोष्टित मी यश नाही मानात ना समाधान शोधत पण तूमचं स्वप्न पूर्ण करु शकले ह्याचा आनंद खुप आहे, जो मी शब्दात नाही मांडू शकत. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमानाने पाणावलेले डोळे मला मेहनत घेऊन काम करण्यासाठी शक्ती देतात. मी खरोखर भाग्यवान आहे कारण तुम्ही माझे आई वडील आहात.” यासोबतच या यामध्ये तिला पाठिंबा देणाऱ्या तिच्या मित्र-मैत्रिणींचेही तिने आभार मानले आहेत. तिच्या या पोस्टवरती तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वतःचे नवीन घर घेतल्याबद्दल नेटकरी तिचे अभिनंदन करत असून तिच्या विचारांनाही सर्वजण पाठिंबा देत आहेत. अनेक कलाकारांनीही तिच्या या पोस्टवर कमेंट्स करत तिचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा : अभिनेत्री ऋतुजा बागवेने लालबागच्या राजाला अर्पण केला ‘खास’ प्रसाद, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ऋतुजाचं ‘अनन्या’ हे नाटक खूपच गाजत आहे. या नाटकात तिने एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे. या नाटकातील ऋतुजाच्या कामाचं भरभरून कौतुक होत आहे. त्याशिवाय सध्या ऋतुजा तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या कामात व्यग्र असल्याचे दिसून येत आहे.