Sagarika Ghatge and Zaheer Khan Blessed with Baby Boy : मराठी अभिनेत्री सागरिका घाटगे व भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांनी चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नानंतर ७ वर्षांनी झहीर व सागरिका आई-बाबा झाले आहेत. चिमुकल्यासह फोटो शेअर करत सागरिकाने मुलाचं नाव देखील जाहीर केलं आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या सिनेमामुळे सागरिका घराघरांत लोकप्रिय झाली. सागरिका घाटगेने मराठीसह बॉलीवूडमध्येही काम केलं आहे. ‘चक दे इंडिया’ चित्रपटाच्या निमित्ताने सागरिकाला थेट शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. २०१७ मध्ये अभिनेत्रीने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानबरोबर लग्न केलं. आता लग्नाला सात वर्षे पूर्ण होताच अभिनेत्रीने आई झाल्याची आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.
झहीर-सागरिकाने बाळाचं नाव काय ठेवलं?
सागरिकाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर बाळाबरोबरचा पहिला फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. तसेच बाळाचं नाव काय ठेवलंय हे देखील सर्वांना सांगितलं आहे.
अभिनेत्री लिहिते, “प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादांसह आम्ही आमचा गोंडस मुलगा फतेहसिंह खानचं स्वागत करत आहोत.” सागरिका व झहीर यांनी त्यांच्या लेकाचं नाव ‘फतेहसिंह खान’ असं ठेवलं आहे.
सध्या सागरिकाच्या पोस्टवर बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सुरेश रैना, आकाश चोप्रा, हुमा कुरेशी, अंगद बेदी, डायना पेन्टी, उपासना या सेलिब्रिटींनी सागरिकाच्या पोस्टवर कमेंट्स करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
झहीर-सागरिकाची लव्हस्टोरी
सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले.काही वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, पहिल्या भेटीत हे दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या आणि अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांवेळीही सागरिका त्याला पाठिंबा देताना दिसली होती. अखेर या दोघांनी २०१७ मध्ये नोंदणी पद्धतीने लग्न केलं. दरम्यान, शाहरुखबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सागरिकाने ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याव्यतिरीक्त तिने अतुल कुलकर्णींबरोबर ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही काम केलं आहे.