श्रुती कदम
‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘भक्षक’ अशा मराठी-हिंदी दोन चित्रपटांनी अभिनेत्री सई ताम्हणकरने या वर्षाची सुरुवातच मोठ्या धडाक्यात केली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या, शाहरुख खानची निर्मिती असलेल्या ‘भक्षक’ चित्रपटातील अभिनयाबद्दल तर सईवर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. या वर्षाची सुरुवातच कामाने झाली आहे, याबद्दल आनंद व्यक्त करतानाच पुढे वर्षभर हिंदी-मराठी चित्रपटांमध्येच आपण व्यग्र असल्याची माहिती सईने दिली आहे. कलाकार म्हणून चित्रपटांचा आणि वैयक्तिक आयुष्यातील स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न यावर्षी करणार असल्याचे सईने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
महिलांचं अपहरण आणि त्यानंतर त्या महिलांवर होणारा अन्याय यावर भाष्य करणारा ‘भक्षक’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरने पत्रकार वैशाली सिंहची भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकरने पोलीस अधिकारी जस्मित गौर ही विशेष भूमिका साकारली आहे. सध्या ‘भक्षक’चीच सर्वत्र चर्चा असल्याने गप्पांची सुरुवात या चित्रपटापासूनच होते. अनाथ मुलींना चुकीची औषधं देऊन त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करणारा खलनायक बन्सी साहू निर्धास्तपणे गुन्हे करत फिरतोय आणि या अन्यायाविरुद्ध लढणारी पत्रकार वैशाली सिंह निडरपणे सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतेय. अनाथ मुलींवर होणाऱ्या अन्यायाविषयी सरकारला माहिती असूनही बन्सी साहूच्या दबावाखाली सरकार गप्प आहे. या गोष्टी बाहेर आणण्यासाठी व त्या मुलींना योग्य तो न्याय देण्यासाठी पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करतात हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे यात जस्मित या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारतानाचा तिचा अनुभव काय होता याविषयी ती सविस्तर बोलते. ‘जेव्हा तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश अंगावर चढवता तेव्हा आपसूकच एक जबाबदारीची भावना तुमच्या मनाचा ताबा घेते. त्या गणवेशाचं महत्त्व तुम्हाला समजतं आणि त्यानुसार तुम्ही कामाला सुरुवात करता. माझ्याबाबतीतही असंच घडलं’ असं सई सांगते.
हेही वाचा >>> मामाच्या प्री-वेडिंगमध्ये ईशा अंबानींच्या जुळ्यांचा मोहक अंदाज, आईबरोबरच्या फोटोंनी वेधलं लक्ष
दिग्दर्शकामुळे गोष्टी सोप्या…
जस्मित गौर हे पात्र साकारताना आलेल्या आव्हानाबद्दल बोलताना सई म्हणाली, ‘या पात्राचा सविस्तर अभ्यास करणं, ते समजून घेणं हे माझ्यासाठी आव्हान होतं. एखादं पात्र साकारताना त्याचे निर्बंध पाळणं हे फार गरजेचं असतं, पण जस्मित गौर हे पात्र साकारण्यासाठी आम्हाला दिग्दर्शकाची खूप मदत झाली. सेटवर येऊन मेहनत घ्या, गोष्टीशी निगडित बाबींचा खोलात जाऊन अभ्यास करा, तुमच्या संवादातील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घ्या, असा सल्ला दिग्दर्शकाने दिला होता. त्यामुळे आपसूकच व्यक्तिरेखा हळूहळू आकळत गेली. सुरुवातीला अवघड वाटणारं चित्रण पुढे हसतखेळत पार पडलं’ , असं सई म्हणते.
भूमीबरोबरची गंमत…
या चित्रपटात सईने अभिनेत्री भूमी पेडणेकरबरोबर काम केलं आहे. भूमीबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. आपापल्या पात्राविषयीची चर्चा असेल किंवा पुढच्या दृश्याची तयारी करायची असेल तेव्हा प्रत्येकवेळी तिच्याशी मनमोकळं बोलणं व्हायचं. ती नेहमी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. त्याचाही फायदा आम्हाला या चित्रपटासाठी झाला. ती सेटवर नेहमी एक छान वातावरण तयार करते. त्यामुळे तिच्यासोबत बोलताना कधीच कोणाला संकोच वाटत नाही, अशी आठवण सईने सांगितली.
हेही वाचा >>> अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये अमृता फडणवीस आणि रिहानाची ग्रेट भेट; फोटो शेअर करत म्हणाल्या…
२०२४ हे वर्ष माझ्यासाठी खऱ्या अर्थाने कामात गुंतलेलं असणार आहे. कारण या वर्षात मी मराठी आणि हिंदी दोन्हीकडे चित्रपट आणि वेब मालिका करते आहे. ‘भक्षक’ नंतर दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्या ‘अग्नी’ या एक्सेल प्रॉडक्शन निर्मित आगामी चित्रपटाचं काम लवकरच सुरू होईल. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याची मी फार मनापासून वाट पाहते आहे. त्यानंतर मराठीमध्ये एका चित्रपटाचं काम सुरू असून लवकरच एका वेब मालिकेचं चित्रीकरणही सुरू होणार आहे, असं सांगत यावर्षी भरपूर काम करणार असल्याची माहिती तिने दिली.
भटकंतीही हवीच…
२०२४ हे वर्ष माझं कामाने सुरू झालं. त्यामुळे या वर्षभरात मला खूप प्रवास करायचाय, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं आहे. नवनवीन गोष्टी अनुभवायच्या आहेत. तसंच या वर्षात स्वत:साठी नवीन गाडी घेण्याचा विचार करते आहे. काम करता करता या दोन्ही इच्छा पूर्ण करण्यासाठीही मी प्रयत्नशील असेन, असं सईने सांगितलं.
‘पोलीस यंत्रणेवरचा विश्वास दृढ झाला’
अशा अन्याय्य गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणं हे खूप गरजेचं आहे, असं मत सईने व्यक्त केलं. एरवी चित्रपटांमध्ये पोलिसांची वाईट बाजू कित्येकदा एकांगीपणे रंगवली जाते. इथे मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस अधिकारी कशा प्रकारे काम करतात याचं चित्रण पाहायला मिळेल. या कथेच्या आणि माझ्या पात्राच्या निमित्ताने माझा पुन्हा पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवर दृढ विश्वास बसला आहे, असं तिने सांगितलं.