प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांचं लग्न व त्यानंतर त्यांचा घटस्फोट या गोष्टी त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आणि तितक्याच चर्चेच्याही ठरल्या. बराच काळ चर्चा झाल्यानंतर या दोघांनी सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत रीतसर चाहत्यांना कळवलंही. आता हे दोघे आपापल्या आयुष्यात आपापल्या मार्गानं पुढे गेलेले असतानाच तेलंगणाच्या काँग्रेस नेत्या व पर्यावरणमंत्री कोंडा सुरेखा यांनी समांथाच्या घटस्फोटाबाबत एक विधान केलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल चर्चेची राळ उडवून दिली. यामुळे संतप्त झालेल्या समांथानं कोंडा सुरेखा यांना परखड शब्दांत सुनावलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या कोंडा सुरेखा?

कोंडा सुरेखा यांनी दोन दिवसांपूर्वी बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव उर्फ केटीआर यांच्यावर राजकीय स्वरूपाची टीका केली. मात्र, असं करताना त्यांनी त्यात तेलुगू चित्रपटसृष्टीचाही उल्लेख करत थेट समांथा व नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाचा उल्लेख केला. “केटीआर यांनी अनेक जोडप्यांना विभक्त केलं आहे. त्यामध्ये समांथा व नागा चैतन्य या जोडप्याचाही समावेश आहे. केटीआर यांनी अनेकांना चित्रपटसृष्टी सोडण्यास भाग पाडलं आहे”, असं विधान त्यांनी केलं.

खरंतर कोंडा सुरेखा यांच्यासाठी ही एक राजकीय स्वरूपाची टीका होती. पण त्यात त्यांनी समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांना ओढल्यामुळे समांथाचा संताप झाला. समांथानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिची भूमिका मांडतानाच कोंडा सुरेखा यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

“जबाबदारीनं वागा”

समांथानं कोंडा सुरेखा यांना जबाबदारीनं वागण्याचा सल्ला दिला आहे. “कोंडा सुरेखाजी, माझ्या आजपर्यंतच्या प्रवासानंतर मी जिथपर्यंत पोहोचले आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. कृपा करून त्याचं महत्त्व कमी करू नका. मला आशा आहे की तुमच्या शब्दांना एक मंत्री म्हणून किती महत्त्व आहे याची तुम्हाला कल्पना असेल. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जबाबदारीनं आणि इतरांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा आदर राखून तुमचं वर्तन ठेवाल”, अशा शब्दांमध्ये समांथानं कोंडा सुरेखा यांना ऐकवलं आहे.

समांथा रुथ प्रभूची इन्स्टाग्राम पोस्ट (फोटो – samantharuthprabhuoffl/Instagram)

“माझा घटस्फोट ही पूर्णत: खासगी बाब”

दरम्यान, तिच्या घटस्फोटाबाबतही समांथानं यावेळी भूमिका स्पष्ट केली. “माझा घटस्फोट ही पूर्णपणे माझी खासगी बाब असून माझी तुम्हाला विनंती आहे की त्याबाबत नको ते अंदाज बांधू नका. आम्ही या गोष्टी सार्वजनिक न करता खासगीच ठेवल्या याचा अर्थ कुणी त्याबाबत चुकीचे तर्क लावावेत असा नाही”, असंही समांथानं तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Samantha-Naga Chaitanya : “समांथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटामागे माजी मंत्री केटीआर यांचा हात”, काँग्रेस नेत्याचा मोठा दावा, “नागर्जुन म्हणाला…”

“माझा घटस्फोट हा आम्ही दोघांनी सामंजस्यानं घेतलेला निर्णय होता. त्यात कोणत्याही राजकीय कट-कारस्थानाचा हात नाही. त्यामुळे तुम्ही कृपया माझं नाव तुमच्या राजकीय वादांपासून लांब ठेवाल का? मी कायमच राजकारणापासून लांब राहिले आहे आणि यापुढेही तसंच राहण्याची माझी इच्छा आहे”, असं समांथानं या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

“…यासाठी खूप धैर्य लागतं!”

दरम्यान, आपल्या पोस्टमध्ये समांथानं सुरुवातीलाच एक महिला म्हणून चित्रपटसृष्टीत तिनं केलेल्या संघर्षावर टिप्पणी केली आहे. “एक महिला म्हणून जीवन जगणं, कामासाठी बाहेर पडणं, जिथे बहुतेकवेळा स्त्रियांना फक्त शोभेचं स्थान दिलं जातं अशा चित्रपटसृष्टीत तग धरून राहणं, प्रेमत पडणं आणि त्यातून बाहेर पडणं, आणि सरतेशेवटी एवढं सगळं होऊनही खंबीरपणे उभं राहून लढत राहणं या सगळ्यासाठी खूप धैर्य आणि सामर्थ्याची गरज असते”, असं समांथानं लिहिलं आहे.

नागार्जुन अक्किनेनी यांनीही केलं लक्ष्य!

दरम्यान, कोंडा सुरेखा यांच्या विधानावर अद्याप नागा चैतन्यची प्रतिक्रिया आलेली नसली, तरी त्याचे वडील अभिनेते नागार्जुन अक्किनेनी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नागार्जुन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये कोंडा सुरेखा यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचं नमूद केलं आहे.

“तुमच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकारणापासून लांबच राहणाऱ्या चित्रपट कलाकारांच्या आयुष्याचा वापर करू नका. कृपया इतर लोकांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा आदर राखा. एका जबाबदार पदावरील एक महिला म्हणून तुम्ही आमच्या कुटुंबाविरोधात केलेली विधानं व आरोप हे पूर्णपणे संदर्भहीन व चुकीचे आहेत”, असं नागार्जुन यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

समांथा व नागा चैतन्य यांचा २०१७ साली विवाह झाला होता. पण चार वर्षांनी २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नुकतीच चैतन्यची अभिनेत्री सोभिता धुलिपाला हिच्याशी एंगेजमेंट झाली असून त्यांनी अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.