अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ अजूनही लोकांच्या चांगलाच स्मरणात आहे. कोविड काळात या चित्रपटाने सगळ्यांची झोप उडवली होती. अल्लू अर्जुनचा हटके अंदाज, रश्मिका मंदानाच्या मोहक अदा याबरोबरच प्रेक्षकांना सर्वात जास्त आवडलं तर ते म्हणजे समांथाचं आयटम सॉन्ग. या गाण्याने प्रत्येक पिढीला थीरकायला भाग पाडलं. सोशल मीडियावर याची प्रचंड रील्स व्हायरल झाली. समांथाचा हॉट सेक्सी लूक, तिच्या अदा आणि जोडीला अल्लू अर्जुनचा नाच हे समीकरण भलतंच आवडलं. तीच समांथा आता नव्या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
समांथाच्या ‘यशोदा’ या आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. असं म्हंटलं जातंय की हा चित्रपट तिच्या करकीर्दीतला सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे. मध्यंतरी याचं पोस्टर व्हायरल झालं होतं पण नुकताच याचा टीझर प्रदर्शित झाला असून समांथा यामध्ये वेगळ्याच अवतारात दिसणार आहे.
टीझर बघता हा चित्रपट एक उत्तम थ्रिलर असू शकतो आणि यामध्ये गरोदर महिलांशी निगडीत सगळे मापदंड मोडीत काढण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. टीझरमध्ये सुरुवातीला समांथाला आपण आई होणार आहोत ही बातमी मिळते आणि त्यानंतर ती त्या प्रत्येक गोष्टी करताना दिसते ज्या एका गरोदर स्त्रीने कधीच करणं योग्य नाही. या टीझरमध्ये समांथा अॅक्शन मोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल. गूढ रहस्य दडलेला हा यशोदाचा टीझर प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारा आहे.
आणखी वाचा : आता केवळ ७५ रुपयांत पाहायला मिळणार रणबीर आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’
सोशल मिडियावर समांथाच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी तो टीझर शेअर करत समांथाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘यशोदा’ हा चित्रपट एका गर्भवती महिलेच्या जीवनाशी निगडीत असून तो मूळ तेलुगू भाषेत चित्रित केला गेला आहे. पण नंतर हा चित्रपट तामीळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्येदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘पुष्पा’मधल्या मादक गाण्यानंतर समांथाच्या या चित्रपटासाठी सगळेच उत्सुक आहेत.