‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. यापूर्वी समीराला एक मुलगा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये समीराने तिच्या प्रेग्नंसीच्या वृत्ताला दुजारा दिला असून ती चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. समीराने नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती बेबी बम्पसोबत दिसून आली. विशेष म्हणजे तिने बेबी बम्पसोबत कॅमेराला काही पोजही दिल्या. प्रेग्नंसीनंतर समीरा पहिल्यांदा पब्लिक इव्हेंटमध्ये दिसली.
‘माझ्या प्रेग्नंसीबाबत होत असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी पुन्हा एकदा आई होणार आहे. आता मी चार महिन्यांची प्रेग्नंट असून जुलैमध्ये आमच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन होणार आहे. २०१९ मध्ये आम्हाला दुसरे बाळ व्हावे, अशी माझी आणि अक्षयची इच्छा होती. त्यामुळे मी अनेक चित्रपटही नाकारले’, असं समीराने मुलाखतीत सांगितलं.
२००२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या समीराचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. त्यानंतर तिने आपल्या मोर्चा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीकडे वळविला. तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
समीराने २१ जानेवारी २०१४ मध्ये उद्योजक आणि ‘वेर्देची’ या सुपरबाईक्स कंपनीचा मालक अक्षय वर्देसोबत लग्न केल. समीराला एक मुलगा असून तिने २५ मे २०१५ रोजी पहिला मुलाला जन्म दिला होता.