सध्या अनेक मराठी नाटकांना प्रेक्षक गर्दी करत आहेत. रंगभूमीवर सुरू असलेल्या अनेक नाटकांचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे. यापैकीच एक नाटक म्हणजे ‘चारचौघी.’ बॉलीवूड अभिनेत्री शेफाली शाह हिने हे नाटक पाहिलं आणि ते मंत्रमुग्ध झाली.
‘चारचौघी’ या नाटकात रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, कादंबरी कदम या प्रमुख भूमिकेत आहेत. तर श्रेयस राजे, पार्थ केतकर, निनाद लिमये या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री आणि ओटीटी स्टार शेफाली शाह नुकतीच या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होती. तिने हे नाटक पाहिलं आणि ती भारावून गेली.
हे नाटक पाहिल्यावर तिने मराठीत प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी आत्ताच चारचौघी हे नाटक पाहिलं आणि मी भारावून गेले आहे. खूप सुंदर, खूप नाजूक… इतक्या वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं आहे आणि आजही ते तितकंच मनाला भिडतं. सगळ्या कलाकारांची कामं आणि या नाटकाचं लिखाण पाहून मी नि:शब्द झाले आहे. मला खूप आनंद होतोय आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला या नाटकाचा सुंदर अविष्कार बघण्याची संधी मिळाली.”
शेफाली शाहचा हा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत या नाटकाचे तर सर्वजण कौतुक करत आहेतच पण त्याबरोबरच शेफालीला अस्खलित मराठी बोलताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.