‘बुरा ना मानो, होली है…’ असं म्हणत धुळवडीच्या दिवशी ठिकठिकाणी रंगांची उधळण केली जाते. मात्र या रंगाचा मुक्या प्राण्यांना प्रचंड त्रास होत आहे. होळीच्या एक-दोन दिवसानंतर सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत होता. यात एक माणूस हा जबरदस्तीने त्या कुत्र्याला रंग लावताना दिसत होता. या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री शिबानी दांडेकरने त्या कुत्र्याचा जीव वाचवला आहे.
अभिनेत्री शिबानी दांडेकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. होळीनंतर सोशल मीडियावर एका कुत्र्याला काही जण जबरदस्तीने रंग लावतानाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत होता. हा संपूर्ण व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. हा संपूर्ण व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शिबानीने बचाव पथकाला टॅग करत मदत मागितली होती.
“होळीच्या दिवशी रॉक्सी नावाच्या कुत्र्याला एका व्यक्तीने बळजबरीने रंग लावला होता. त्याच्यासोबत अतिशय वाईट वर्तन केले होते. रॉक्सीला हे अजिबात आवडले नाही आणि तो दिवसभर सतत भुंकत होता आणि त्या घटनेला विरोध करत होता. मात्र त्या माणसाला आणि त्याच्या साथीदाराला अजिबात त्याची दया आली नाही. त्यांनी या मुक्या प्राण्याला त्रास देणे तसेच सुरु ठेवले”, असे शिबानीने म्हटले होते.
शिबानीची ही संपूर्ण पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली होती. तिने त्याच्या बचावासाठी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले जात होते. त्यानंतर नुकतंच शिबानीने पुन्हा एकदा त्या कुत्र्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘हा रॉक्सी…आठवला का? आठवड्याभरापूर्वी काहीजण त्याच्याशी किती वाईट वागले होते?’ असा प्रश्न तिने विचारला आहे.
त्यासोबत ती म्हणाली, ‘आम्ही रॉक्सीला वाचवण्यात पूर्ण यशस्वी झालो आणि आता तो त्याच्या एका नवीन घराकडे जाण्यास उत्सुक आहे. यावेळी तिने रॉक्सीसोबतचे फोटो शेअर केले आहे. यात तिने कुत्र्याला वाचवण्यात मदत केल्याबद्दल दोन व्यक्तींचे आभारही मानले आहेत.’ दरम्यान शिबानीचे याबाबतचे कौतुक केले जात आहे.