नऊवारी साडी, अंबाडा, ठसठशीत दागिने, रुपयाएवढं कुंकू आणि चेहऱ्यावर कमालीचे सोज्वळ भाव हे एकेकाळच्या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचं रुप होतं. मात्र कालांतराने कलाविश्वात अनेक बदल झाले. बॉलिवूडमधील काही फॅशनचा शिरकाव मराठी चित्रपटसृष्टीत झाला. तर मराठी कलाविश्वातील काही गोष्टी बॉलिवूडने आत्मसाद केल्या. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे नऊवारी साडी. आज अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांमध्ये खास अभिनेत्री नऊवारी साडीत दिसून येतात. प्रियांका चोप्रा, काजोल, दीपिका पदुकोण अशा अनेक अभिनेत्री नऊवारी साड्यांमध्ये वावरताना दिसल्या आहेत. त्यांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक फोटो अभिनेत्री सोनाली बेंद्रेने शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोत ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेक वेळा ती तिचे थ्रोबॅक फोटो शेअर करत असते. यामध्येच तिने तिच्या नऊवारी साडीतील पारंपरिक वेशातील लूक शेअर केला आहे. यात सोनालीने केसांचा अंबाडा, पारंपरिक मराठमोठे दागिने असा पेहराव केला आहे. हा फोटो गुढीपाडव्याचा असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, सोनालीने शेअर केलेला फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. सोनाली बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री असून अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं.