बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. सोनम कपूर सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये तिच्या मित्रमैत्रिणींनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नुकतंच सोनम कपूर ही लंडनहून मुंबईत परतली आहे. याच पार्श्वभूमीवर तिचे वडील अभिनेते अनिल कपूर यांनी खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसेच इतर शहरात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सोनम कपूरचा मुंबईत आयोजित केलेल्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कपूर कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंब सोनम कपूरच्या बेबी शॉवरची तयारी करत होते. यानिमित्ताने अनेक पाहुण्यांना आमंत्रण आणि त्यासोबत भेटवस्तूही पाठवण्यात आल्या होत्या.

येत्या १७ जुलैला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कविता सिंह यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर होणार होता. मात्र करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. आरोग्याप्रती दक्षता बाळगून त्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे. तर दुसरीकडे, सोनम कपूरलाही तिच्या होणाऱ्या बाळाबद्दल कोणतीही निष्काळजीपणा दाखवायचा नाही. त्यामुळे तिनेही हा कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

या कार्यक्रमासाठी तिची मैत्रिणी मसाबा गुप्ता ही खास ड्रेस तयार करणार होती. तर अनिल कपूर आणि सुनिता कपूर हे दोघे ही पार्टी होस्ट करणार होते. या कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यात दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, मलायका अरोरा, करीना कपूर, स्वरा भास्कर, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह अनेक कलाकारांना निमंत्रणही पाठवण्यात आलं होतं.

सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. सध्या सोनम कपूरने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. ती लवकरच ब्लाइंड या चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे दिसणार आहेत. बाळ झाल्यानंतर सोनम कपूर या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे.