बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गाबरे’ म्हणून मान्यता पावलेल्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या गेले काही दिवस सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत होत्या व त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांनी एकूण ६० चित्रपट केले. त्यातील ‘आँधी’ हा त्यांचा चित्रपट विशेष गाजलेला होता.
श्वसनमार्गातील संसर्गाने सुचित्रा सेन यांना २३ डिसेंबरला बेले व्हू क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना खासगी अतिदक्षता विभागात हलवले होते. दक्षिण कोलकाता येथे वास्तव्यास असलेल्या सेन यांनी देवदास, आँधी, सात पाके बंधा, अग्निपरीक्षा, सप्तपदी, दीप ज्वेले जाय हे चित्रपट त्यांनी केले होते. सुचित्रा सेन या अखेरच्या काळात एकटय़ाच राहात होत्या व त्यांची तुलना हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा गाबरे यांच्याशी केली जात असे. डॉ. सुब्रता मैत्र यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत होते. सुचित्रा सेन यांच्या कन्या व अभिनेत्री मुनमुन सेन यांनी सर्वाना आपल्या मातोश्रींच्या वतीने अभिवादन केले.
सेन यांच्यावर दक्षिण कोलकाता येथील केवरतला स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुचित्रा सेन यांची जोडी उत्तमकुमार यांच्याबरोबर छान जमलेली होती. साधारण १९५०-७० दरम्यानचा तो काळ होता. सेन यांना १९५५ मध्ये ‘देवदास’ चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवल्या गेलेल्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या. ‘सात पाके बंधा’ या चित्रपटासाठी त्यांना १९६३च्या मॉस्को चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल होता. त्यांचा १९७८ मधील ‘प्रणॉय पाश’ हा सौमित्र चटर्जी यांच्याबरोबरचा चित्रपट पडला. त्यानंतर त्या सार्वजनिक जीवनातून दूर गेल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा