Tunisha Sharma Suicide Case Update अभिनेत्री तुनिषा शर्माने केलेली आत्महत्या ही अत्यंत धक्कादायक घटना ठरली. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा होते आहे. अवघ्या २० व्या वर्षी तुनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी शिझान खानला अटक केली आहे. शिझान खान आणि तुनिषा या दोघांचं ब्रेक अप काही दिवसांपूर्वीच झालं होतं. आता या दोघांचं ब्रेक अप का झालं? याचं कारण शिझान खानने सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे शिझान खानने?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर ज्या शिझानला अटक करण्यात आली त्याने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. शिझानने प्राथमिक स्तरावर जे वक्तव्य केलं आहे त्यानुसार त्याने हे सांगितलं आहे की आम्ही दोघंही रिलेशनशिपमध्ये होतो. मात्र दोघांचे धर्म वेगवेगळे होते. त्यामुळेच आमचं ब्रेक अप झालं. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
शिझानच्या वक्तव्यावर पोलिसांचा विश्वास नाही कारण…
शिझानने पोलिसांना जी कबुली ब्रेक अपच्या बाबत दिली आहे त्यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नाहीत कारण तुनिषाच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने शिझानवर एकाच वेळी अनेक मुलींसह रिलेशन ठेवल्याचा आणि त्यांना फसवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना असं वाटतं आहे की आपला बचाव व्हावा म्हणून शिझान धर्म वेगळे असल्याने आम्ही वेगळे झालो असं सांगतो आहे.
१५ दिवसांपूर्वी झालं शिझान-तुनिशाचं ब्रेकअप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुनिषाच्या आईने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितलं की शिझान आणि तुनिषा हे दोघं सहा महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आपल्या शिझानसोबतच्या नात्यामुळे तुनिषा खूप आनंदी होती. तिने आपल्याला ही बाब सांगितलीही होती असंही तिच्या आईने पोलिसांना सांगितलं. तसंच १५ दिवसांपूर्वी शिझान आणि तुनिषा या दोघांचं ब्रेक अप झालं. या घटनेनंतर ती खूप तणावग्रस्त झाली होती. माझ्या मुलीने आत्महत्या केली कारण तिचं शिझानसोबत ब्रेक अप झालं असा आरोपही तुनिषाच्या आईने केला आहे.
तुनिषाच्या आईने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शिझानच्या विरोधात FIR दाखल केली आणि त्याला अटक केली. FIR च्या कॉपीत लिहिलेल्या माहितीनुसार तुनिषा आणि शिझान हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेक अप झालं. या दोघांचं नातं तुटल्यानंत तुनिशा टेन्शनमध्ये आली होती. शिझानसोबत नातं तुटल्याचा ताण सहन न झाल्याने तुनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिझान पोलीस कोठडीत
शिझानला अटक करण्यात आल्यानंतर त्याला वसई कोर्टात आणण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिझान आता २८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. तुनिषा ही टीव्ही जगतातली एक रायझिंग स्टार होती. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक खास स्थान या अभिनेत्रीने निर्माण केलं होतं. तुनिषाने विद्या बालन, कतरिना कैफ यांच्यासोबतही काम केलं होतं.