विभावरी देशपांडे,अभिनेत्री

आताची पिढी वाचत नाही, अशी ओरड सुरू असते; परंतु त्यांनी काय वाचावे, वाचनातून काय मिळते, हे तरुणाईपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी वाचनाकरिता पुस्तक हे एकच माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पुस्तकांचा मोठा संग्रह होत होता; परंतु आता बदलत्या काळानुसार आपल्याकडे दूरचित्रवाहिन्या, भ्रमणध्वनी, किंडल यांसारखी साधने ज्ञान मिळविण्याकरिता वापरली जात आहेत. त्यामुळे आजची पिढी जरी पुस्तके हातात घेऊन वाचण्यास तेवढी तत्पर नसली, तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाची शिदोरी गोळा करण्याकरिता वाचनाची आजच्या काळातील माध्यमे आम्हा कलाकारांकडून व आजच्या तरुणांकडून मोठय़ा प्रमाणात वापरली जात आहेत.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

माझा जन्म दीक्षितांच्या घरातील. आमच्या घरात पुस्तकांचे वातावरण होते. त्यामुळे मला आठवतेय तेव्हापासून माझ्या आजूबाजूला सर्वत्र पुस्तकेच आहेत. डेक्कन जिमखान्यावरील इंटरनॅशनल बुक सव्‍‌र्हिस हे दुकान माझ्या आजोबांनी सुरू केले. पुढे माझ्या वडिलांनी (उपेंद्र दीक्षित) जवळपास ६० वर्षे ते चालविले. माझी आई (डॉ. मनीशा दीक्षित) लेखिका असल्याने मला अक्षरओळख होण्यापूर्वीच पुस्तकांतील शब्द कानावर पडावेत, यासाठी ती प्रयत्नशील होती. माझ्या आईने अनेक वर्षे नाटय़समीक्षक म्हणून काम पाहिले. त्यामुळे आमच्या घरामध्ये पुस्तके ही जेवणाइतकीच मूलभूत गरज होती, असे म्हटले तर वावगे होणार नाही. अगदी लहानपणी मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये होते; परंतु मराठी माध्यमातून म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवे हे आईला काही दिवसांनी जाणवले. त्यामुळे तिने मला विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये घातले. अगदी ८-९ वर्षांची असल्यापासूनच मला वाचनाची ओढ वाटू लागली. आई अनेकदा मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये जाऊन भरपूर पुस्तके आणायची आणि अवघ्या दोन दिवसांत कितीही मोठा गठ्ठा असला तरी मी पुस्तके वाचून काढत असे. त्यामुळे आमच्या घरामधील शेल्फ हे पुस्तकांनी नेहमीच ओसंडून वाहत होते.

रशियन लोककथा, जपानी अनुवादित पुस्तके यांतून माझ्या वाचनप्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर भा. रा. भागवत, नंदू नवाथे यांच्या साहित्यासह इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत, विक्रम-वेताळ ही माझी आवडती पुस्तके. शाळेमध्ये भट बाईंनी पुस्तकांप्रमाणेच मराठी भाषेवर प्रेम करायला शिकविले. एखादी म्हण किंवा सुविचार लिहून आणायचा आणि त्याचे विश्लेषण वर्गामध्ये करायचे या उपक्रमामुळे मला भाषेविषयीचा अभ्यास आणि वक्तृत्वगुण वाढविण्यास मदत झाली. भाषेची जाण आणि शब्दमांडणीची पद्धत मी शिकत होते. इयत्ता नववीमध्ये असतानाच सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेत जाण्याची संधी मिळाली आणि माझी नाटकवाचनाची सुरुवात झाली. त्या वेळी विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांची नाटके आवर्जून वाचत होते. मराठीसोबतच इंग्रजी वाचनही समृद्ध व्हावे, यासाठी प्रयत्नपूर्वक इंग्रजी वाचन करीत होते. एरिच सेगल, रीचर्ड बाच, जॉन ग्रिशम या लेखकांचे साहित्य मी वाचले. पु. ल. देशपांडे, आशा बगे, विजया राजाध्यक्ष यांचे साहित्य मला आवडते. आईचा अनेक लेखकांशी जवळचा संबंध असल्याने शांता शेळके, दिलीप पाडगावकर, गो. नी. दांडेकर, पु. ल. देशपांडे अशा दिग्गजांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली.

वाचनाने आपल्या विचारांना खोली मिळते. मन व बुद्धीची दारे खुली होतात. त्यामुळे उत्तम वाचनासोबतच शुद्धलेखन असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कन्नड नाटकाचे दिग्दर्शन असो, इंडो-जर्मन समूहासोबतचे काम किंवा दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन या सर्वच ठिकाणी मी भाषेचे वाचिक आणि लिखित सौंदर्य जपण्याचा प्रयत्न केला. ‘श्वास’, ‘सातच्या आत घरात’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारताना त्याच्याशी सुसंगत वाचन केले. एखाद्या कलाकाराने आपल्या विचारांच्या समृद्धीकरिता विविध विषयांचे सातत्याने वाचन करणे तितकेच आवश्यक आहे. चित्रीकरणादरम्यान किंवा पुणे-मुंबई प्रवास करताना मोकळ्या वेळात माझ्याजवळ पुस्तके सतत असतात. माझ्या बुकशेल्फमध्ये ‘वीरधवल’, ‘मराठी रियासत’, ‘मिशन काश्मीर’, ‘क्रौंचवध’, ‘उत्तमोत्तम एकांकिका पुरुषोत्तमच्या’, ‘कार्यरत’, ‘बाकी शून्य’, ‘भायखळा ते बँकॉक’, ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’, ‘काठ’ अशी चारशेहून अधिक पुस्तके आहेत.

पुस्तकांप्रमाणेच आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाकरिता अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामध्ये किंडलचा वापर मी मोठय़ा प्रमाणात करते. जर्मनीला गेले होते, तेव्हा माझ्याकडे किंडल नव्हते. जर्मनीमध्ये तीन महिने असताना सोबत नेलेली माझ्याजवळची सर्व पुस्तके वाचून संपली. त्या वेळी जर्मनीतील एका छोटय़ा गावामध्ये पुस्तकांचे दुकान होते. त्या दुकानात एकच पुस्तकांचे शेल्फ होते. सर्व जर्मन पुस्तकांच्या गर्दीत एक इंग्रजी अनुवादित पुस्तक मला मिळाले होते. ते मी अधाशासारखे वाचून काढले.

मराठी, इंग्रजीसह हिंदी साहित्याच्या वाचनाचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुन्शी प्रेमचंद, मिर्झा गालिब यांचे साहित्य वाचले. लहान मुलांचे भावविश्व उलगडणारे प्रकाश नारायण संत यांचे साहित्य मला भावले. सुभाष अवचट, मेघना पेठे यांच्या निर्भीड लेखनाने मी प्रभावित झाले. ताज्या घडामोडी जाणून घेणे मला आवडते. त्यामुळे वर्तमानपत्रे, ब्लॉग्ज आणि त्यासंबंधी पुस्तकांचे सातत्याने वाचन करते. एखादा सामान्य माणूस असो किंवा कलाकार प्रत्येकाने वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तके ही त्यासाठी उत्तम आयुधे असून आपल्यामधील संवेदनशीलता जपण्याचे ते माध्यम आहे.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ