आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री विशाखा सुभेदारला ओळखले जाते. सोनी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली. तिच्या विनोदी बुद्धीमुळे तिने जवळपास ४ वर्षांहून अधिक काळ या कॉमेडी शोमध्ये काम केले. लवकरच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरु होणार आहे. मात्र या पर्वातही विशाखा सुभेदार झळकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘ई-टाइम्स’ने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने फेसबुक पोस्ट लिहित यामागचे कारण सांगितले होते. त्यानंतर अनेक प्रेक्षकांना धक्का बसला होता. मात्र ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वात पुन्हा दिसू शकते असे बोललं जात होतं. मात्र विशाखा सुभेदार ही या नव्या पर्वाचा भाग नसणार आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या फोटोमागचे सत्य
ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विशाखा सुभेदार ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सहभागी होणार नाही. तिने या कार्यक्रमाला कायमचा रामराम केला आहे. त्यामुळे ती या कार्यक्रमाच्या नव्या भागात झळकणार नाही. पण तिच्याऐवजी या कार्यक्रमात अनेक विनोदी कलाकार पाहायला मिळणार आहे. जे या कार्यक्रमात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून हे नवी पर्व सुरु होणार आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने मोठे सेलिब्रेशनही करण्यात आले होते. ५०० नव्हे तर ५००० भाग पूर्ण होतील अशा शुभेच्छा या मालिकेला प्रेक्षकांनी दिल्या. मात्र त्यानंतर विशाखा सुभेदार ही मालिका सोडत असल्याची बातमी प्रेक्षकांना मिळाली आणि त्यांना धक्काच बसला. यावेळी तिने एक फेसबुक पोस्टही शेअर केली होती.
“…अन् दोन सेकंद काळजात धस्स झालं”, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची भावनिक पोस्ट
“मला काही मोठं काम मिळालं नाहीय किंवा मी दुसरी मालिका करत नाही किंवा नवीन पिढी तयार होतेय हे सहन होत नाहीय असले घाण आरोपही कोणी लावू नका. कारण पिढ्या घडायलाच हव्या…! आणि आपली एक्सिट पण ध्यानात असायलाच हवी. “जा आत्ता “असं म्हणण्यापेक्षा. “अर्रर्रर्रर्र “हे ऐकायला जास्त छान वाटतं नाही कां..! फक्त आता वेगळ्या धाटणीचे काही करण्याचा विचार आहे. त्यामुळे लवकरच दुसऱ्या भूमिकेतून भेटू,” असे म्हटले होते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम २०१८ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे नवे पर्व येत्या १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – चार वार हस्याचा चौकर’, असे या नव्या पर्वाचे नाव आहे. यात नक्की काय नवीन असणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच हे गुपित उलगडणार आहे. या नव्या पर्वात समीर चौगुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, गौरव मोरे आणि इतर कलाकार दिसणार आहेत.