कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमात या आठवड्यात महाराष्ट्राचे लाडके गायक, संगीताचा वारसा लाभलेले दोन लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे येणार आहेत. या कार्यक्रमात बऱ्याच गप्पा रंगल्या तसेच गाणी देखील सादर झाली. राहुल देशपांडे यांनी लहानपणीच्या आणि पु. ल. देशपांडे यांच्या आठवणी देखील सांगितल्या. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी काय उत्तरे दिली तसेच कोणते किस्से ऐकायला मिळतील यासाठी प्रेक्षक उत्सुक असतीलच. या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील विशेष भाग रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
मकरंद अनासपुरेनं राहुल देशपांडे यांना आनंद आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकली का? असा प्रश्न विचारला. त्यावर होकार देत गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला जायचो तेव्हा तिथे यांची गाणी असायची असं म्हणाले. त्याचवेळी आदर्श शिंदेनं बाप्पा मोरया रे या गाण्याच्या दोन ओळी म्हणून दाखविल्या. आदर्श आणि राहुल एकत्र असल्यावर गाणी सादर होणार नाही असं शक्यच नाही. राहुलने देखील बगळ्यांची माळ फुले हे गाण सादर केले. यानंतर प्रश्नोत्तरांचा खेळ सुरु झाला.
चक्रव्यूह राऊंडमध्ये आदर्शला सुरेश वाडकर यांच्याविषयी एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली गेली. यानंतर आदर्शने सुरेश वाडकर यांचे ‘ऐ जिंदगी’ हे गाणं गाऊन दाखवलं. याच राऊंडमध्ये राहुलला प्रशांत दामले यांच्याबाबत आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली गेली. तसंच राहुल देशपांडे यांनी पु.ल.देशपांडे यांची एक सुंदर आठवण प्रेक्षकांना सांगितली आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीतावर घर चावलणं कठीण असल्याची खंतसुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.