गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या निमित्ताने सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. करोनानंतर दोन वर्षांनी गणपती बाप्पाचे थाटामाटात जल्लोषात आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा सर्वत्रच बाप्पाची आरास, प्रसाद, डेकोरेशन आणि सर्व तयारी जय्यत करताना दिसत आहे. सध्या सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वत्र लगबग सुरु झाली आहे. या निमित्ताने नुकतंच प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांचे गाणे रिलीज झाले आहे.
श्रीगणेशा देवा श्रीगणेशा… असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्यात ढोल ताशांचा गजर … गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष… असे गणेशोत्सवातील भारावून जाणारे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच बाप्पाविषयीची भाविकांची आत्मियता या भावपूर्ण गाण्यातून व्यक्त होत आहे. ‘अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंट प्रा. लि. या गाण्याची प्रस्तुती केली आहे.
आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!
आदर्श शिंदे यांच्या आवाजातील या गाण्याला ओंकार घाडी यांनी शब्दबद्ध केले आहे. तर काशी रिचर्ड यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. गणेशोत्सवात सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे.
या गाण्याबद्दल प्रतिक्रिया देताना आदर्श शिंदे म्हणाले, ”मुळात बाप्पाचे गाणं गायला मला नेहमीच आवडते. भक्तिमय गाणी गाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ”श्रीगणेशा देवा श्रीगणेशा…” हे गाणेही असेच स्फूर्तिदायी गाणे आहे. हे गाणे भाविकांनाही आवडेल, अशी मी आशा व्यक्त करतो.” सध्या आदर्श शिंदे यांचे हे गाणे चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेक कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.