अभिनेते विजय चव्हाण आजारी असताना किती लोक त्यांना भेटायला गेले, असा सवाल करत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी विजूमामा म्हणत शोक व्यक्त करणाऱ्यांना उपरोधानं फटकारले. आता मामा मामा म्हणणारे ते आजारी असताना कुठे होते असा सवाल कुंडलकरांनी विचारला होता. यावर व्यक्त होताना, अर्धवट माहितीच्या आधारे टीका करणे योग्य नाही असे म्हणत शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी प्रत्युत्तर दिले तसेच शिवसेनेच्या वतीनं स्वत: केलेल्या प्रयत्नांचा उल्लेखही केला.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. विजय चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. “चव्हाण यांच्या आजाराची बातमी उद्धव ठाकरेंना समजली. तसंच त्यांना श्वसनाचा विकार असल्याचंही त्यांना कळलं. त्यानंतर त्यांनी मला आवश्यक ती मदत तातडीनं करण्यास सांगितलं. त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच त्यांना श्वसनाचा आजार असल्यानं आवश्यक असलेलं अडीच लाख रुपयांचं ऑक्सिजन काँन्सस्ट्रेशन मशिनदेखील घेऊन दिलं,” उद्विग्न झालेल्या बांदेकरांनी लोकसत्ता ऑनलाइनला सांगितलं. हे मशिन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, परंतु आम्ही आमच्याकडून शक्य ते प्रयत्न करत होतो असं ते म्हणाले. आम्ही काय करतोय हे कधी सांगायला गेलो नाही, परंतु कुंडलकरांच्या त्या पोस्टनंतर मात्र रहावत नाही म्हणून हे सांगत असल्याचं ते म्हणाले.
कुंडलकरांची भावना मी समजू शकतो, परंतु एवढा मोठा आरोप सरसकट करण्यापूर्वी त्यांनी परिस्थितीची नीट माहिती घ्यायला हवी एवढीच माझी अपेक्षा आहे, या पलीकडे काही नाही असं बांदेकर म्हणाले.

काय होती सचिन कुंडलकर यांची ती पोस्ट ?

‘रंगभूमीवरील प्रत्येक व्यक्ती तुमचा मामा किंवा मावशी कशी होते आणि आणि दर आठवड्याला कोणा मामा किंवा मावशीचं निधन होत असल्यास रंगभूमी पोरकी कशी काय होते? जेव्हा विजू मामा रुग्णालयात होते, तेव्हा तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात का? आता उमेश कामत तुमचे मामा आणि स्पृहा जोशी तुमची आत्या होणार का? सई ताम्हणकर ही तुमची मावशी होणार का? पुन्हा यानंतर अमेय वाघ मामा आणि पर्ण पेठे मावशी होणार का? ही कशाप्रकारची मूल्यं आहेत. रंगभूमी पोरकी झाली, हे किती तथ्यहिन आणि रटाळ वाक्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर शोक कसा व्यक्त करतात हे तरी निदान शिकून घ्या,’ असं त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.