अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. प्रशांत दामले यांनी ६ नोव्हेंबर त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्यप्रयोगानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशात आता या प्रयोगाच्या निमित्ताने मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षक कऱ्हाडेने लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
संकर्षण कऱ्हाडेप्रमाणे त्याचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडेही सोशल मीडियावर सक्रिय असतो. अधोक्षजने अभिनेते प्रशांत दामले यांच्याबरोबर ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकात काम केलं आहे. आता प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने अधोक्षजने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यात त्याने प्रशांत दामले यांनी त्याला ‘माझा तुझ्यावर विश्वास नाही असं समज’ असं म्हटल्याचा उल्लेख केला आहे. पण प्रशांत दामले असं का म्हणाले हे त्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे.
आणखी वाचा- “मी मनाने तिथेच…” प्रशांत दामलेंच्या विक्रमी नाट्यप्रयोगला बिग बींनी मराठीत दिल्या शुभेच्छा
काय आहे अधोक्षज कऱ्हाडेची पोस्ट?
“२ ऑगस्ट २०२२. सकाळी पावणेनऊची गोष्ट. माझ्या रूटीन प्रमाणे मी सकाळी नुकताच जिममधून घरी आलो होतो. मोबाइलचं इंटरनेट ऑन केलं आणि पहिला मेसेज फ्लॅश झाला तो दामले सरांचा. मी मेसेज उघडण्याआधीच संकर्षणला विचारलं, “तू दामले सरांचा कॉल उचलला नाहीस का? त्यांना रिप्लाय दिला नाहीस का?” सहसा, संकर्षणकडून जर कधी दामले सरांचा कॉल मिस झाला तर ते लगेच मला कॉल किंवा मेसेज करून “अधो, संक्या कुठेय?” असं विचारतात. पण मी मला आलेला तो मेसेज उघडला, तर दामले सरांनी लिहिलं होतं, “अधो, रविवार 6 नोव्हेंबर माझ्यासाठी राखून ठेव, आत्ताच डायरी मधे लिहून ठेव आणि लिहिलंस की मला सांग.माझा तुझ्यावर विश्वास नाही असं समज”
मला प्रश्न पडला, “सरांनी असा मेसेज का केला असेल? तो ही चक्क ३ महिने आधी? काय असेल?” सगळे तर्क वितर्क माझ्या डोक्यात चालू झाले. बरं, त्यांना मेसेज करून “काय आहे त्यादिवशी सर?” असं विचारायचं धाडस होईना. मी लगेचच माझ्या डायरीमध्ये ६ नोव्हेंबरच्या पानावर ” Reserved for Damle Sir” अशी नोंद केली आणि सरांना फोटो काढून पाठवला!
पुढे काही दिवसांनी सरांची भेट झाल्यावर त्यांना विचारलं तेव्हा सर म्हणाले, “माझा १२५०० वा प्रयोग आहे, त्या प्रयोगासाठी तुला यायचं आहे!” मला प्रचंड आनंद झाला! एक प्रेक्षक म्हणून पण आणि एक सहकलाकार म्हणून सुद्धा! खरतर मी दामले सरांसोबत ‘साखर खाल्लेला माणूस’ ह्या एकाच नाटकाचे फक्त ७२ प्रयोग केले, ते ही रीप्लेसमेंट आर्टिस्ट म्हणून. ते १२५०० प्रयोगांच्या १% सुद्धा नाहीत! पण तरीही त्यांनी मला लक्षात ठेवलं, आवर्जून ह्या विश्वविक्रमी प्रयोगाला बोलावलं, याचं मला खूप आश्चर्य, आनंद, कौतुक, आदर आणि संकोच वाटला.
ह्या ७२ प्रयोगात मी दामले सरांकडून खूप गोष्टी शिकलो. अजूनही शिकतोय. संवाद म्हणताना कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा, लाफ्टर कसे काढायचे, स्टेजवर आणि बॅकस्टेजला कसं अलर्ट राहायचं, लिसनिंग कसं वाढवायचं, आणखीही बरंच काही…!
‘साखर’ च्या निमित्तानं मला दामले सरांच्या रुपात गुरू तर मिळालेच, पण त्याचबरोबर कधीकधी हक्काने रागावणारा, समजून सांगणारा, समजून घेणारा, सल्ले देणारा आणि कधीकधी माझ्याकडून टेक्नॉलॉजीकल सल्ले घेणारा वडीलधारा मित्रही मिळाला! त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं अजून खूप आहे, पण ते पुन्हा केव्हातरी.एवढंच सांगतो, व्यावसायिक रंगभूमीवर या माणसानं मला उभं केलं!
सर, तुम्ही नवीन विश्वविक्रम करताय. पुढेही अनेक होत राहतील. मला तुमच्यासारखं होता येणं अशक्य आहे. निदान त्या दिशेनं प्रवास करण्याची प्रेरणा मिळावी, एवढाच आशीर्वाद असू द्या.”
दरम्यान ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटकाचा हा प्रयोग सायनमधील श्री ष्णमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे संपन्न झाला. या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र काम करत आहे. त्यांनी नाटकांसह काही चित्रपटांमध्येही काम केले होते. या दोघांव्यतिरिक्त या नाटकामध्ये अतुल तोडणकर, प्रतीक्षा शिवणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे हे कलाकार काम करत आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.