‘पाणी’ या चित्रपटाच्या यशानंतर आदिनाथ कोठारे एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पाणी’ चित्रपटाची कथा आणि यातील गाणी थेट सामान्य माणसांच्या काळजाला भिडली. खेड्यापाड्यासह शहरांमध्येही अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. अशा विषयावर चित्रपट बनवल्यानंतर आता आदिनाथ कोठारेकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. अशात नुकतीच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

आदिनाथने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोत सनेमा क्लॅपरबोर्डवर ‘बेनं’ असं नाव लिहिण्यात आलं आहे, तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये पहाटेच्यावेळी एक जहाज खोल समुद्रातून वाट काढत आहे; पुढे रात्रीच्या अंधारात वळणांच्या वाटेवरून एक चारचाकी जात आहे. तसेच पुढील दोन फोटोंमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळत आहे. आदिनाथने हे फोटो पोस्ट करत याला सुंदर कॅप्शनही दिलं आहे. “बेनं… एक नवं स्वप्न! एक नवा प्रवास सुरू…”, असं आदिनाथने यावर लिहिलं आहे.

आदिनाथ कोठारेने या चित्रपटाची घोषणा केल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाच्या आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे. चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार? चित्रपटाची कथा आणि गाणी कशी असणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, अद्याप ‘बेनं’ या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. सिनेविश्वातील अनेक कलाकारांसह चाहत्यांनी आदिनाथच्या या पोस्टवर कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे, तर एका चाहत्याने “पाणी चित्रपट बघितल्यानंतर आता आम्ही आतुरतेने वाट बघतोय… लवकर या राव…”, अशी कमेंट केली आहे.

राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘पाणी’ चित्रपटाची कथा प्रत्येक सामान्य माणसाला आवडली. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदिनाथ कोठारेने केलं होतं, तर निर्मिती प्रियांका चोप्राने केली होती. चित्रपटात आदिनाथसह सुबोध भावे आणि किशोर कदम यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

आदिनाथ कोठारेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, १९९४ मध्ये आलेल्या ‘माझा छकुला’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदा काम केलं होतं. त्यावेळी बालकलाकार म्हणून त्याने आदिनाथ हे लहान मुलाचं पात्र साकारलं होतं. बालकलाकार म्हणून त्याच्या कामाचंही त्यावेळी अनेकांनी कौतुक केलं. त्यानंतर ‘वेड लावी जीवा’, ‘दुभंग’, ‘सतरंगी रे’, ‘झपाटलेला २’, ‘हॅलो नंदन’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘पाणी’ अशा चित्रपटांत त्याने काम केलं आहे. आता लवकरच तो ‘बेनं’ आणि ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या दोन आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader