‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटासाठी नवतारकेचा डॅडी (महेश कोठारे) शोध घेत असताना एका सकाळी मी झोपेतून उठत असताना घरी आलेल्या उर्मिलाला पाहताच तिच्या प्रेमात पडलो, अशी कबूलीच आदिनाथ कोठारे याने दिली. बोरीवली येथील ‘जय महाराष्ट्र नगर’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वसंत व्याख्यानमाला’मधे तो बोलत होता.
उर्मिला अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच पण पत्नी म्हणून मला जास्त आवडते. आमची सर्वसामान्य माणसांप्रमाणे भांडणे होतात पण त्यातून चांगलेच निष्पन्न होते असेही त्याने सांगितले.
मराठी चित्रपटाची विविध विषयावरची मांडणी, त्यांची तांत्रिक प्रगती व व्यावसायिक झेप याबाबत आजच्या मराठी चित्रपट क्षेत्रातील आम्ही युवा पिढीतील कलाकार नशीबवान आहोत असेही तो म्हणाला.
आदिनाथने यावेळी पुढे सांगितले, महाराष्ट्रातील दुष्काळावर आधारीत ‘पाणी’ या वास्तवाची जाणिव करून देणारा चित्रपट मी आता दिग्दर्शित करीत असून, त्याच्या तयारीचा भाग म्हणून ‘कान’ चित्रपट महोत्सवाला जात आहे. अशा महोत्सवातून जगभरच्या चित्रपटाची काही प्रमाणात ओळख होईल. तसेच ‘पाणी’सारखा चित्रपट जगभरातील चित्रपट महोत्सवात कसा न्यावा हेदेखील जाणून घेण्याची संधी मिळेल.
माझ्या डॅडींपेक्षा माझ्या चित्रपटाची शैली पूर्णपणे वेगळी आहे, याचा त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी विनोदाच्या माध्यमातून काही सामाजिक गोष्टी मांडल्याचे सांगत आदिनाथ पुढे म्हणाला मी लहानपणी डॅडींच्या चित्रपटांचे कोल्हापूर येथे चित्रीकरण असताना नेहमीच जात असे. मे महिन्यात सुट्टीतर हमखास जाई. तेव्हा मी त्यांच्या माझा छकुला या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली. पण चांगले शिक्षण घेऊन मगच अभिनय क्षेत्रात आलेले उत्तम असा मी विचार केला. ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटासाठी डॅडीं नवीन चेहरा शोधत होते, तेव्हा त्याना वाटले की मीच त्या भूमिकेला योग्य आहे. असा माझा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला, असेही त्याने सांगितले.
अभिनयाबरोबरच तांत्रिक बाजू तसेच व्यावसायिक जबाबदारी यात आपले कौशल्य दाखवून देण्यात आजची पिढी खूपच मेहनत घेत आहे. खूपच मोठ्या प्रमाणात नवीन तंत्र विकसीत होत जाताना त्यात चित्रपट व छोट्या पडद्यावर आश्चर्यकारक बदल होतील असेही तो म्हणाला.

Story img Loader