‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चित्रपट वीकेंडपर्यंत थिएटर्समध्ये टिकेल, अशी शक्यता खूप कमी आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाने केलेली कमाई पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तब्बल ६०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट सहाव्या दिवशी सपशेल आदळला आहे. कमाईत सातत्याने होणारी घसरण पाहता चित्रपट वीकेंडला मुसंडी मारण्याची शक्यता दिसत नाही.
हेही वाचा – कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस तुफान कमाई करत चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले, पण चौथ्या दिवसापासून चित्रपटाला उतरती कळा लागली आहे. तिसऱ्या दिवशी ७० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी फक्त १६ कोटी रुपये कमावले, पाचव्या दिवशी १० कोटी आणि आता सहाव्या दिवशी फक्त साडेसात कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर बुधवारी रिलीजच्या सहाव्या दिवशी फक्त ७.५ कोटी कमवू शकला. बुधवारी पुन्हा एकदा ‘आदिपुरुष’च्या कमाईत मोठी घट झाली आहे. या चित्रपटाने २५० कोटींच्या कलेक्शनचा आकडा पार केला आहे. याची एकूण कमाई आता २५५.३० कोटींवर गेली आहे.
६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या घटत्या कमाईमुळे निर्माते चिंतातूर झाले आहेत. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी पुढील दोन दिवसांसाठी थ्रीडी तिकिटांची किंमत कमी केली आहे. टी-सीरिजने एका पोस्टद्वारे २२ जून आणि २३ जून रोजी ‘आदिपुरुष’ची 3D तिकिटं फक्त १५० रुपयांमध्ये मिळतील, असं सांगितलं. इतकंच नाही तर निर्मात्यांनी चित्रपटातील अनेक वादग्रस्त संवादही बदलले आहेत. एवढं सगळं करूनही चित्रपट वीकेंडला मुसंडी मारतो की नाही, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.