मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याच्या आदिपुरुष या चित्रपटाची सध्या सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यात अभिनेता प्रभास, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’बद्दल विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी तर टीझर पाहून चित्रपटामधील कलाकारांच्या लूकची खिल्ली उडवली. या चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबतही नेटकरी टीका करत आहेत. नुकतंच या चित्रपटाबद्दल महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाजने प्रतिक्रिया दिली आहे.
रामायण आणि महाभारत या दोन मालिका ८० आणि ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय होत्या. या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. नितीश भारद्वाज यांनी महाभारतात कृष्णाची भूमिका साकारली होती. नितीश भारद्वाज यांनी नुकतंच इंडिया टुडेशी बोलताना याबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ओम राऊत आणि चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “बिग बॉस आदेश देत आहे की…” आवाजामागचे गुपित उलगडले
“मी आदिपुरुष चित्रपटाचा टीझर पाहिला. मला तो फारच आवडला. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चित्रपट निर्माते एखाद्या चित्रपटाला कशी वेगळी आणि चांगली दृष्टी देत आहेत, हे पाहून फार चांगले वाटले. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि तो टीझरही आवडला, प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडेल, अशी आशा आहे. मी ओम राऊत यांचे अभिनंदन करतो. हा चित्रपट पाहण्यासाठी मी फारच उत्सुक आहे”, असे नितीश भारद्वाज म्हणाले.
दरम्यान आदिपुरुष हा चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विविध ५ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. याचे बजेट ५०० कोटी असल्याचे बोललं जात आहे. याचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणीही केली आहे.